Udayanraje Bhosale's reaction to MLA Nitesh Rane's Malhar Mutton Certificate
सातारा : राज्यामध्ये हलाल मटण आणि मल्हार मटण असा वाद रंगला आहे. भाजप नेते आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मल्हार मटणावरुन निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लीम व्यक्ती नसल्याचे देखील वक्तव्य केले. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावर आता उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. त्यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबाबत प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही, असे त्यांनी म्हटले. तर नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असे स्पष्ट मत उदयनराजे भोसले यांनी मांडले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी मल्हार मटणाच्या सर्टिफिकेटवर देखील प्रतिक्रिया देत ज्यांना खायचे आहे त्यांनी खा असे सांगितले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. यावरुन राज्यामध्ये वाद पेटला आहे. यावर उदयनराजे भोसले म्हणाले की, “मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, “इतर धर्माच्या सर्व पुस्तकामधे मटण कापण्याच्या व खाण्याच्या पद्धती बद्दल लिहले आहे परंतु हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात मटण कापायचे, खाण्याच्या पद्धती बद्दल लिहले नाही. का कारण? हे ग्रंथ लिहिणारे कोण होते? वेदांच्या आधीच्या पुस्तके वाचली त्यात मांस निषिद्ध मानले नाहीहिंदू धर्माच्या सर्वसमावेशक गुणामुळे अथवा वृत्तीमुळे हजारो वर्षात मांस खाण्याबद्दल ज्या काही संकेत, प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत त्यात प्रचंड वैविध्य आढळून येते. हिंदू धर्मातील काही जाती व जातीमध्ये सुद्धा काही पंथ, पोट जाती या शुद्ध शाकाहारी आहेत. भारतातील ९५% लोक मांसाहार करतात, त्यांना जर विचारले की तुम्ही आणलेले मटण हलाल आहे की झटका त्यांना ते सांगता यायचे नाही. त्यामुळे एखाद्या मटणाला मल्हार मटन म्हणले काय, झटका मटण म्हणले काय, हलाल मटन म्हणले काय त्याचा फारसा परिणाम मटणाच्या गुणवत्तेवर होणार नाही आणी खाणाऱ्यावर ही होणार नाही. हा सुद्धा एक पब्लिसिटी स्टंट आहे,” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.