कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून पोलीस शोधत असलेला सतीश भोसले अखेर उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या हाती लागला आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. यामुळे विरोधकांनी देखील अटकेची जोरदार मागणी केली होती. सतीश भोसले याला अटक केल्यानंतर यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधीमंडळामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. विजय वडेट्टीवार हे म्हणाले की, बीडचे राजकारण हे नासलेले आहे. बीडचे एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. उद्या फ्री स्टाईल होईल तर परवा तलवारी निघतील. नंतर बंदुका निघतील. त्यानंतर एकमेकांचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात समोर उभे ठाकतील, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “राजकीय नेत्यांना वेळीच सावरले नाही तर ह्यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की मागील दोन वर्षामध्ये ठाण्याचा भरभरून विकास झाला. हा विकास एकनाथ शिंदे यांनी केला. प्रचंड प्रमाणात ठाण्याला पैसे देण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामध्ये थर्ड पार्टी चौकशी होण्याची गरज आहे. कामगार विभागामध्ये काम न होता बिले काढली जात आहेत. निपक्ष चौकशी होण्याची गरज आहे,” असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “बीड म्हणजे बिहारला मागे टाकणारा बीड झाला आहे. बीडच्या बिळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लपले आहेत. बिळातील गुन्हेगारांना जोपर्यंत बाहेर काढून संपवत नाहीत तोपर्यंत बीड शांत होणार नाही. बीडमध्ये अशा घटना सुरुच राहतील. निष्पाप लोकांचा जीव जात राहिल,” अशी घणाघाची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्याच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र निवडणुकीवेळी देण्यात आलेले 2100 रुपयांचे आश्वासन पाळण्यात आलेले नाही. यामुळे देखील विरोधकांनी टीका केली आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आता राज्याच्या सरकारची स्थिती अशी आहे की त्यांना अंडरवेअर घालायला पैसे नाहीत. आणि बोलत आहे की जॅकेट घालून देणार. ओव्हर ड्राफ्ट काढून राज्य चालवत आहेत. आणि काय नवीन योजनांची गोष्ट करत आहेत. त्यामुळे जे सुरु आहे ते सुरु ठेवा. फक्त प्रामाणिकपणे सुरु ठेवा,” असा टोला विजय वडेट्टीलवार यांनी लगावला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सतीश उर्फ खोक्या भोसले याला अटक करण्यात आली आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले की, अटक झाली आहे तर चांगला आहे. खोके भेटले की खोक्या मागचे बोके कोण आहेत ते पण शोधा. आणि इकडे जसा बाकाचा आका शोधला तसा आता खोक्याचा बोका पण शोधा. म्हणजे आनंद होईल. हे पैसे कुठून आणले. एवढे पैशांचे बंडल कुठून येतात. एवढा खजिना कुठून येतो? त्यासाठी कोणचा आशिर्वाद आहे, असे अनेक प्रश्न आहे. नितेश राणे हे देखील त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सरकारला अडचणींमध्ये आणणार आहे. आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तू कर आणि बोल. हे काय सुरु आहे? धार्मिक भावना, सामाजिक भावना, महापुरुषांच्याबाबत वक्तव्य आणि आता मल्हार मटण अशी विधान केली जात आहे. मल्हारराव होळकर हे काय मटणच खात होते काय? मल्हार नाव कुठून आलं? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.