शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत विश्वनाथ भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कल्याण :– राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वेगाने वाहत असताना दिसून येत आहे. सर्वच पक्षात राज्य आणि जिल्हा पातळीवर होणाऱ्या राजकीय हालचालींना वेग येत असल्याचं दिसून येत आहे.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंगळवारी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याण पश्चिमेतील खडकपाडा ते मुंबई विद्यापीठ चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रविवारी रात्री जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. विश्वनाथ भोईर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला आहे. एकीकडे ढोल ताशांचा गजर साथीला ब्रास बँड आणि शिंदेसेना व महायुतीच्या जयघोषात विश्वनाथ भोईर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
विधानसभा निवडणूकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीत या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गता नाराजी असल्याचं वेळोवेली दिसून येत आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार आणि कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत. दोन्ही गटातील नाराज झालेल्या आमदारांनी संबंधित पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे आमदार भोईर यांनी याबाबत काही खुलासे केले आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार भोईर म्हणाले की, महायुतीत कोणत्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही. आम्ही एकत्र लढणार आहोत. तसंच महायुती अभेद्य आहे असं भोईर यांनी सांगितलं. पुढे भोईर असंही म्हणाले की, पक्षांतर्गत काही वाद असतील त्यामुळे असे निर्णय घेतले असावे. असं भोईर म्हणाले. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हे सर्व वाद मिटलेले असतील. आम्ही एक अभेद्य महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा-शिवसेना प्रबळ असतानाही…! सदानंद चव्हाण यांनी बोलून दाखवली खंत
यावेळी विश्वनाथ भोईर यांच्यासह शहरप्रमुख, माजी नगरसेवक माजी नगरसे विका वैशाली विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक,माजी परिवहन समिती सदस्य यांच्यासह कल्याण, मोहने, टिटवाळा भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.