फोटो सौजन्य- प्रतिनिधी
जमीर खलफे/रत्नागिरी : मोठे शक्ती प्रदर्शन करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार प्रमोद गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (२८ ऑक्टोबर) गुहागर तहसील कार्यालयात दाखल केला. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे आणि सौ. गांधी उपस्थित होत्या.फटाक्यांच्या आतषबाजीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी येथील मनसेच्या कार्यालयातून मिरवणुकीला सुरुवात झाली. शेकडो कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सुमारे ६० ऑटोरिक्षा तसेच महिलांचे ढोल पथक हे हा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
ही मिरवणूक शृंगारतळीमधून गुहागर येथील शिवाजी चौकामध्ये दाखल झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक थेट गुहागर तहसीलदार कार्यालयात आली. त्यानंतर नियमाप्रमाणे फक्त पाच व्यक्ती आतमधे प्रवेश देण्यात आला. यात उमेदवार प्रमोद गांधी यांच्यासह मनसेचे कोकणचे नेते वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, सौ. गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुहागरमधील प्रमुख उमेदवार
गुहागर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी अर्ज भरला आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून राजेश बेंडल हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. आज मनसेकडूनही प्रमोद गांधी यांनी अर्ज भरल्याने हे तीन उमेदवार या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार असणार आहेत.आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनीही डमी उमेदवारी अर्ज भरला आहे.
आमदार भास्कर जाधव यांचे वर्चस्व
गुहागर मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघामध्ये 2009 पासून भास्कर जाधव यांचे वर्चस्व आहे. त्यांनी सलग तीनवेळा येथून विजय मिळवला आहे. 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ते विजयी झाले तर 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत घरवापसी करत निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूकही भास्कर जाधव यांचे पारडे जड वाटत आहे. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅंड नेते म्हणून समोर आले आहेत.
भाजपात नाराजीचा सूर
महायुतीमध्ये या जागेबद्दल सुरुवातीला मोठ्याप्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली. या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार विनय नातू हे उत्सुक होते. त्यांनी मागील काही महिन्यांपासून मतदारसंघ बांधणीही सुरु केली होती. तसेच इतर सर्व मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला जाणार असल्याने गुहागर मतदारसंघ तरी भाजपला मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र शिंदे गटाने हा मतदारसंघ जागावाटपात स्वत:कडे ठेवला. त्यामुळे भाजपामध्ये काहीप्रमाणात नाराजीचा सुर आहे. अजित पवार गटाचे नेते, गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी काही दिवसांपुर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती.