सर्व देवतांमध्ये आराध्य दैवत कोण तर गणपती. गणेशोत्सव म्हटला की, कोकण आणि मुंबई व्यतिरिक्त आणखी एक ठिकाण आठवतं ते म्हणजे पुणे. कला आणि संस्कृती जपणाऱ्या या पुण्यात देखील गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केले जातात. पुण्य़ातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचे महत्व खूप आहे. लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मात्र य़ाच पुण्यात असाही एक गणपती आहे जो जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या गणेशमुर्तीची जडण घडण ते त्याची प्राणप्रतिष्ठापणा हे सर्व काही अतिशय रंजक आहे. काय आहे या गणेशमुर्तीचं रहस्य चला जाणून घेऊयात…
पुण्यातील हा असा गणपती आहे ज्याच्या मुर्तीपासून ते प्राणप्रतिष्ठापणेपर्यंत सर्व काही रहस्यमय आहे. या गणपतीचं नाव आहे गरुड गणपती. असं म्हणतात की 50 वर्षांपूर्वी हा गणपती ग्रहणात बसवला होता. या मूर्तीचं वैशिष्ट्यं म्हणजे पुण्यतील अष्टविनायक ज्यांनी घडविले त्याच मुर्तीकराने ही गरुड गणपतीची मूर्ती घडवली. या मुर्तीकाराचं नाव म्हणजे नागेश शिल्पी. नागेश यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती साकारली आहे. या मुर्तीकरांबद्दल सांगायचं तर ते मुहुर्त बघून मुर्ती घडवायचे. एवढंच नाही तर मूर्तीमध्ये नवग्रह रत्न देखील बसवायचे. रंजक बाब म्हणजे मुर्ती घडवण्य़ाचे देखील त्यांचे नियम होते. ते ओल्या अंगाने आणि सोहळं नेसून मूर्ती घडवायचे.
गरुड गणपतीच्या कथेबाबत सांगायचं तर, इतर मूर्तींप्रमाणे ही मूर्ती देखील डाव्या सोंडेची रचना करण्यास घेतली होती. मात्र हा गपणती पाहिला तर लक्षात येईल की याची सोंड उजव्या दिशेला काहीशी वळलेली आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, या गणपतीच्या दर्शनाला जो कोणी येतो तो रिकाम्या हाती पुन्हा जात नाही. या गणपतीची रंजक गोष्ट म्हणजे .याची प्राणपतिष्ठा ग्रहणात केलेली आहे. या गणपतीची रचना म्हणजे गरुडावर आरुढ असलेली गणपती. गणपती हा विघ्नहर्ता तर गरुड हा दुष्टांचा नाश करणारा. त्यामुळे गरुड गणपतीचे पूजन केल्यास अडथळे दूर होतात आणि रक्षण लाभते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळी पुण्यातील एका ज्योतिषाने ग्रहणाच्या वेळी पुण्याचे रक्षण व्हावे म्हणून गरुडावर आरूढ गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून बसवली.ग्रहणाचा काळ हा सामान्यतः अपशकुन मानला जातो, पण योग्य मंत्रोच्चार आणि श्रद्धेने केलेली प्राणप्रतिष्ठा शहराला संकटापासून संरक्षण देते असा विश्वास होता.म्हणूनच गरुड गणपती पुण्याचे रक्षणकर्ते मानले जातात.