फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी शिष्य गुरुंचा आशीर्वाद घेतात. या गुरुपौर्णिमेला काही शुभ योग तयार होत आहे. गुरु पौर्णिमा नक्की कधी आहे, जाणून घ्या
प्रत्येक महिन्याला पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला विशेष असे स्वतःचे महत्त्व असते. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यावेळी गुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. कारण या दिवशी महर्षी वेद व्यासजींचा जन्म झाला होता अशी रचना महाभारतामध्ये केलेली आढळते. यावेळी गुरुपौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी एक शुभ योग देखील तयार होत आहे.
पंचांगानुसार, आषाढ पौर्णिमेची सुरुवात गुरुवार, 10 जुलै रोजी पहाटे 2.43 वाजता होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 11 जुलै रोजी पहाटे 1.53 वाजता होईल. उद्यतिथीनुसार, यंदा गुरु पौर्णिमा गुरुवार, 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
यंदाची गुरु पौर्णिमा खास असणार आहे कारण या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे. इंद्रयोगाची सुरुवात सकाळपासून रात्री 9.38 वाजेपर्यंत असेल. नंतर वैदृतीयोग तयार होईल. त्याचप्रमाणे यामध्ये भद्राचाही समावेश असेल. मात्र भद्रा पाताळात असल्याने त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही.
मान्यतेनुसार, महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यासजी यांचा जन्मदिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यासपौर्णिमा असे देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, यावेळी वेदव्यासजींनी चार वेदांची रचना केली. या दिवशी गुरु त्यांच्या शिष्यांना दीक्षा देतात. त्यामुळे गुरु शिष्यांचे अतुट असे नाते व्यक्त केले जाते.
ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, भारतामध्ये गुरुंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दर्जा देण्यात आलेला आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करुन आपल्या गुरुंचे आणि पालकांचे आशीर्वाद घ्यावे. या दिवशी गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून गुलाबाची फुले, पेन इत्यादी भेटवस्तू दिल्या जातात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये नेहमीच आनंद आणि सुख समृद्धी राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)