फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप धार्मिक महत्त्व आहे. यावेळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी शुभ मुहूर्तावर नागाची पूजा केल्याने भक्ताला विशेष लाभ होतो त्याचसोबत जीवनातील अनेक समस्या दूर होतात. या दिवशी बरेच लोक उपवास देखील करतात. तसेच नागपंचमीच्या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास ठेवतात. जाणून घ्या कधी आहे नागपंचमी आणि नागाला दूध देण्याचे महत्त्व
यंदा नागपंचमी मंगळवार, 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी नागाची पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 5.41 ते 8.23 पर्यंत असेल. एकूण पूजेसाठी कालावधी 2 तास 43 मिनिटे एवढा आहे.
पौराणिक कथेनुसार, सुमंतु मुनींनी नागपंचमीची कथा राजा शतानिकला सांगितली. श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नाग लोकामध्ये मोठा उत्सव होतो. पंचमीच्या दिवशी जो व्यक्ती सापांना गाईच्या दुधाने आंघोळ घालतो, त्याच्या कुटुंबाला साप संरक्षण देतात. त्याचे कुटुंब सापांना घाबरत नाही आणि कालसर्प दोषापासून मुक्त होते, असे मानले जाते. त्याचप्रमाणे महाभारतात जन्मेजयाच्या नाग यज्ञाची देखील एक कथा सांगण्यात आलेली आहे. या कथेनुसार जन्मेजयाच्या नाग यज्ञादरम्यान, प्रचंड आणि राक्षसी साप आगीत जळू लागले. त्यावेळी आस्तिक नावाच्या ब्राह्मणाने सर्प यज्ञ थांबवला आणि सापांचे रक्षण केले. त्या दिवशी पंचमी तिथी होती.
श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन चांगले कपडे परिधान केले जातात. त्यानंतर नागाची पूजा केली जाते. एका पाठावर किंवा चौरंगावर नागदेवतेचे चित्र काढून किंवा मातीपासून बनवलेल्या नागाची मुर्ती घरी आणावी. त्यानंतर त्याची पूजा करताना हळद, रोळी, तांदूळ, फुले इत्यादी गोष्टी अर्पण करावे. त्यानंतर दूध, तूप, साखर वापरुन त्याचा नैवेद्य दाखवावा. पूजा करुन झाल्यानंतर नागपंचमीची कथा ऐकावी किंवा वाचावी आणि आरती करुन पूजेची समाप्ती करावी.
नागपंचमीचा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी सुहासिनी नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी नागाला दूधदेखील अर्पण केले जाते. या दिवशी नागाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास त्यांनी ही पूजा करणे गरजेचे आहे. मान्यतेनुसार, कुटुंबातील कोणत्याही सदस्याला स्वप्नात साप दिसत असल्यास किंवा तो सापांना घाबरत असेल तर या दिवशी पूजा केल्याने देखील भीती दूर होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)