
ओटी भरणं म्हणजे सौभाग्य प्रतीक म्हणतात. देवीचं कुठलंही रुप पाहिलंत तर ती गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, असा एकंदरितच देवीचा साज श्रृंगार असतो. देवी ही स्त्रीत्ववाचं रुप तिचा सन्मान करताना ओटी भरली जाते. पण शास्त्रीयदृष्ट्या सांगायचं झालं तर, ओटी स्त्रियांचीच भरण्यामागे देखील कारण आहे. स्त्रियांच्या नाभीखालच्या भागाला ओटी म्हणतात. या ओटीलगत गर्भाशय असतं. म्हणजे ज्यातून एक जीव जन्माला येतो. मातृत्व आणि एक जीव पोटात वाढवण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये असतं. नववधूची ओटी भरण्याचं कारणच मुळी हे आहे की, लग्नानंतर तिचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि समाधानाचं जावं, तिची भरभराट व्हावी यासाठी देखील ओटी भरली जाते.
मुलीचा साखरपुडा असतो त्यावेळी देखील तिची ओटी भरतात. खरंतर स्त्रियांची ओटी भरण्याची प्रथा ही साखरपुड्य़ापासून सुरु होते. महाराष्ट्राची ही प्रथा म्हणजे केवळ परंपरेचा एक भाग नाही तर, या प्रथेमध्ये स्त्रियांचा केलेला सन्मान आहे. पुर्वीच्या काळी सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरली जाते. ज्यात तांदूळ, कुंकू, नारळ, सुपारी , फळं आणि खण यांचा समावेश असतो. हे ओटीचं फक्त साहित्य नाही तर त्यामागे देखील खूप खोल असा अर्थ आहे.
तांदूळ हे मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. फक्त ओटीचं नाही तर अनेत शुभतकार्यात तांदुळ वापरले जातात. लग्नात अक्षता म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे कुंकू देखील सौभाग्याचं प्रतीक आहे. विवाहित स्त्रिया या सुवासिनी म्हणजेचं साक्षात देवीचं रुप आणि तिचा सन्मान करताना कुंकू हे पाहिजेच असतं. त्यानंतर येतो तो नारळ. नारळ हे श्रीफळ म्हणून पाहिलं जातं तसंच नवनिर्मितीचं प्रतीक देखील आहे. नारळाचा आकार हा स्त्रियांच्या गर्भाशयासारखाच असतो. जसा नारळातून कोंब फुटतो तसाच अंकुर वाढवण्याचं सामर्थ्य स्त्रीयांमध्ये असतं. त्यामुळे नारळ देखील ओटीमध्ये महत्वाचा ठरतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)