फोटो सौजन्य- फेसबुक
श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तसेच या दिवशी बैलपोळा सणदेखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराज्याचा सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असेदेखील म्हटले जाते. पिठोरी अमावस्येचे शुभ मुहूर्त, महत्त्व, उपाय जाणून घेऊया.
पिठोरी अमावस्या शुभ मुहूर्त
या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदया तिथीनुसार सोमवार, 2 सप्टेंबर रोजी येणार आहे. पंचांगानुसार, श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजून 48 मिनिटापासून सुरू होईल, 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल.
हेदेखील वाचा- यंदा बैलपौळा सण कधी साजरा करण्यात येणार आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व
पिठोरी अमावस्येचे महत्त्व
पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित होते.
हेदेखील वाचा- तुमच्या घरातील समृद्धी वाढवण्यासाठी या वास्तू टिप्स वापरुन बघा
पिठोरी अमावस्या पूजा पद्धत
पिठोरी अमावस्येचे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो.
पिठोरी अमावस्येला हे उपाय करा
पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यांने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करुन सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ॐ सूर्य देवाय नम: या मंत्राचा जप करा.
सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पीठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरातदेखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात.