
सुंदरनारायण मंदिरात हरीहर भेट महोत्सव संपन्न
पंचवटी: गोपाल कृष्ण भगवान की जय, जय श्रीराम, बम बम भोले, हर हर महादेव असा हरी-हर नामाचा गजर करीत सुंदर नारायण मंदिरातील ‘हरी’ला बिल्वपत्र व कपालेश्वराला म्हणजे ‘हर’ला तुळशीपत्र अर्पण करीत सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्यासुमारास हरिहर भेटीचा सोहळा रंगला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हरिहर भेट घडविण्यात आली. या हरिहर भेटीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पंचवटी रामकुंड पेथील कपालेश्वर मंदिर व सुंदर नारायण मंदिरात दरवर्षीप्रमाणे कार्तिक मासातील वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सोमवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता हरिहर भेटीचा सोहळा रंगला. हा सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यावेळी कपालेश्वर मंदिरातील शिवलिंगास अर्धनारीनटेश्वर श्रृंगार करण्यात येऊन 56 भोग नैवैद्य दाखवण्यात आला होता. रात्री 12 वाजल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महादेवाची आरती करण्यात येऊन बिल्वपत्र आणि आरती करुन पूजारी बाणेश्वर मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, एकमुखी दत्त मंदिराजवळील पायऱ्या मागनि सुंदर नारायणाची मूर्ती सध्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तेथे नेण्यात आली. याठिकाणी भगवान विष्णू सुंदर नारायणाची आरती करण्यात येऊन, कपालेश्वर महादेवाचे बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास सुंदरनारायण मंदिराचे पुजारी आणि भाविकांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होत. हाती तुळशीपत्र व आरतीची थाळी घेऊन होळकर पुलावरून मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड परिसरातून कपालेश्वर मंदिरात आले. येथे आल्यानंतर बम बम भोलेचा गजर करीत भगवान महादेवाला तुळशीपत्र अर्पण केले. दरम्यान, हरिहर भेटीसाठी निघालेल्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन, पारंपरिक ढोल ताशांच्या गजर करीत मिरवणूक काढण्यात आली, यावेळी कपालेश्वर मंदिरातील पुजारी आणि भाविक सहभागी झाले होते.
हरिहर भेट उत्सवासाठी कपालेश्वर महादेव मंदिर आणि सुंदर नारायण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोदाघाट परिसरातील विविध मंदिरांवर दिवाळी सणापासून विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा संपूर्ण परिसर रंगधिरंगी रंगाने नहाहून निघालेला दिसत होता, रात्रीच्या सुमारास शांत असलेल्या गोदाकाठावरून निघालेल्या मिरवणुकीमध्ये देवाचे नामस्मरण सुरु असल्याचे वातावरण भक्तिमय झाले होते.
या मंदिरामध्ये भव्य आरास, दीपमाळा आणि फुलांनी हे मंदिर सजवले जाते. हे मंदिर भक्तांच्या ओंकारमय भक्तीमध्ये न्हाऊन निघाला. श्रृंगार दर्शनानंतर सुंगध पुष्प, रुद्राक्ष व बेलांच्या अलंकारांनी सजविण्यात येते. भक्तांनी मंत्रोच्चार, भजन आणि हरिनामांनी आराधना केली जाते. मंदिर परिसरामध्ये भक्ती, एकात्मता आणि दिव्य शांततेचा अनुभव सर्वांना अनुभवायला मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)