Darwin Day honors Charles Darwin the father of evolution and a pillar of science
Darwin Day : चार्ल्स डार्विन, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडणारे आणि उत्क्रांतीच्या विज्ञानाला एक नवीन दिशा देणारे महान निसर्गवादी, यांच्या जयंतीनिमित्त १२ फेब्रुवारी रोजी ‘डार्विन दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ विज्ञानाचा गौरव करण्यासाठीच नाही, तर डार्विनच्या अद्वितीय संशोधनाची आणि त्याच्या सिद्धांताचा आजही होत असलेल्या प्रभावाचा सन्मान करण्यासाठीही महत्त्वाचा आहे.
डार्विनचा जीवनप्रवास : ज्ञानाच्या शोधातील अद्वितीय प्रवास
डार्विन यांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी एका संपन्न इंग्रजी कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते, तर आजोबा निसर्गवादी होते. सुरुवातीला वैद्यकीय शिक्षणासाठी एडिनबर्ग येथे दाखल झालेल्या डार्विनला वैद्यकीय क्षेत्रात विशेष रुची वाटली नाही. पुढे त्यांना केंब्रिजमधील क्राइस्ट कॉलेजमध्ये धर्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र, विज्ञान आणि निसर्गाच्या गूढतेने त्यांचे लक्ष वेधून घेतले.
१८३१ मध्ये डार्विनला ‘एचएमएस बीगल’ या संशोधन मोहिमेवर निसर्गवादी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. या प्रवासात त्यांनी दक्षिण अमेरिका, गॅलापागोस बेटे आणि इतर ठिकाणी निसर्गाच्या विविध पैलूंचे निरीक्षण केले. विशेषतः गॅलापागोस बेटांवरील फिंच पक्ष्यांच्या विविध प्रजातींमुळे त्यांना उत्क्रांतीविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता ‘या’ देशानेही केली अमेरिकेसोबत युद्धाची तयारी; ट्रम्प यांच्या विरुद्ध बोलावली अरब देशांची आणीबाणी शिखर परिषद
“ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज” आणि विज्ञानातील क्रांती
डार्विनने आपल्या निरीक्षणांवर आधारित ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज’ हे महान ग्रंथ २४ नोव्हेंबर १८५९ रोजी प्रकाशित केले. या पुस्तकाने नैसर्गिक निवडीच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आणि जीवसृष्टीच्या उत्क्रांतीविषयीच्या पारंपरिक संकल्पनांना आव्हान दिले. त्याच्या सिद्धांताला चर्च आणि परंपरावादी विचारसरणीकडून तीव्र विरोध झाला, कारण त्याने दैवी निर्मितीच्या कल्पनेला धक्का दिला.
डार्विनची जिज्ञासू वृत्ती आणि त्याच्या अनोख्या सवयी
डार्विन केवळ संशोधक नव्हते, तर त्यांच्या जीवनशैलीतही विलक्षण वैशिष्ट्ये होती. उत्क्रांतीच्या सिद्धांतासंदर्भात त्यांनी जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि निसर्गशास्त्र यांचे गहन अध्ययन केले. मात्र, त्याच वेळी ते अज्ञात प्राण्यांच्या मांसाचा स्वाद घेण्याच्या शौकाने प्रसिद्ध होते. त्यांनी जगभरातील सफरीदरम्यान शहामृग, प्यूमा आणि आर्माडिलो यांसारख्या प्राण्यांचा स्वाद घेतला होता.
विशेष म्हणजे, “सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट” हा सुप्रसिद्ध वाक्यांश प्रत्यक्षात डार्विनचा नव्हता, तर तो हर्बर्ट स्पेन्सर या तत्त्वज्ञाने तयार केला होता. तसेच, डार्विन यांनी आपल्या चुलत बहिणीशी विवाह करण्याचा निर्णय घेताना समर्थक-विरोधक यादी तयार केली होती, हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण दर्शवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाने भारताला दिले ‘फायटर जेट किलर’ R-37M क्षेपणास्त्र; पाकिस्ताच्या F-16 च्या तोडीस तोड
डार्विन दिनाचे महत्त्व आणि विज्ञानाचा विस्तार
आजच्या काळात विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये डार्विनच्या सिद्धांताचा प्रभाव दिसून येतो. उत्क्रांतीच्या सिद्धांतावर आधारित जीवशास्त्र, वैद्यक, अनुवंशशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रांमध्ये संशोधन पुढे जात आहे. डार्विन दिनानिमित्त विविध वैज्ञानिक संस्था, शाळा आणि विद्यापीठे कार्यशाळा, चर्चासत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करतात. डार्विन दिन हा केवळ एका शास्त्रज्ञाचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर विज्ञानाच्या शोधमूलक वृत्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यामुळे, या दिवशी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून, डार्विनच्या सिद्धांतांचा आपल्या जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा पुनर्विचार केला पाहिजे.