Devadasi tradition woman dedicated to God history tradition of Jogteen Marathi information
कर्नाटकमध्ये आजही देवदासी परंपरा सुरु आहे. विधानसभेने पीडित देवदासी महिलांना सर्व प्रकारच्या शोषणापासून आणि त्यांच्या मुलांना सामाजिक मागासलेपणातून मुक्त करण्याच्या उद्देशाने एक विधेयक मंजूर करण्यात आले. शतकानुशतके जुनी देवदासी पद्धत देशाच्या काही भागात अजूनही अस्तित्वात आहे. या प्रथेअंतर्गत, वयात आलेल्या मुलींना मंदिरां किंवा देवतांना वाहिले जाते. एकेकाळी ही धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा मानली जात होती. मात्र आत्ताच्या युगामध्ये देखील ही परंपरा सुरु असल्यामुळे देवदासी या शोषित घटक बनून राहिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आणि कर्नाटकमध्ये ही देवदासी परंपरा कायम आहे. देवींच्या नावाने काही तरुण मुलींना सोडले जाते. त्यांना देवीची सेवा करण्याच्या उद्देशाने अर्पण केले जाते. अशा प्रकारे देवाला सोडलेल्या मुलींचे घरदार आणि कुटुंब सुटते. त्यांची सर्व नाती तोडली जातात. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीमध्ये ज्या मुलींना जटा आल्या आहेत त्यांना देवीच्या नावाने सोडले जाते. देवदासी म्हणजे “देवांची दासी”, म्हणजे देवांची सेवा करणारी. या प्रथेत, तरुण मुलींचे मंदिरातील देवतेशी “लग्न” केले जात असे. महाराष्ट्राच्या भागात त्यांचे लग्न झाडांशी लावले जाते. आणि त्यांना कायम सुवासनी म्हणून गणले जाते. मात्र यामुळे अनेकदा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे गुन्हे देखील उघड झाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गावाबाहेर राहणाऱ्या या देवदासी घरोघरी जाऊन जोगवा किंवा भिक्षा मागतात. घराघरांतून जे साहित्य मिळेल त्यांमधून त्यांचा उदर्निवाह केला जातो. मात्र कोणतेही घर आणि ओळख नसलेल्या या देवदासींच्या बाबत अनेक घटना आणि गुन्हे घडत असतात. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून या स्त्रियांवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे दिसून आले आहे. या बाह्यसंबंधातून जन्माला आलेल्या बाळांच्या नशीबी देखील हेच आयुष्य पुढे येते. देवदासींच्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या मुलांना त्यांच्या वडिलांची नावे देखील दिली जात नसल्यामुळे त्यांना समाजामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
देवदासी मुली मंदिरात पूजा, नृत्य (जसे की भरतनाट्यम) आणि इतर धार्मिक सेवा करत असतात. ही प्रथा दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात, सहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत व्यापक होती. त्या काळात देवदासींना सामाजिक आदर होता. त्या मंदिरांच्या कला आणि संस्कृतीचे रक्षक होत्या आणि राजे आणि सम्राट त्यांना आर्थिक मदत करत असत. पण सध्याच्या काळामध्ये होणाऱ्या त्यांच्या शोषणाचे आणि अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे देवदासी परंपरा ही काळाच्या ओघामध्ये शोषणाचे ठरत आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
कालांतराने, विशेषतः मध्ययुगीन काळात, सुलतानशाही, मुघल आणि नंतर ब्रिटीश राजवटीत, मंदिरांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. मंदिरांना मिळणारा राजेशाही पाठिंबा बंद झाला, ज्यामुळे देवदासींसाठी अर्थिक परिस्थिती ही भयानक झाली. एकेकाळी एक आदरणीय प्रथा हळूहळू शोषण आणि वेश्याव्यवसायात रूपांतरित झाली. अनेक देवदासी श्रीमंत पुरुषांच्या दासी बनल्या आणि त्यांच्या मुलींनाही त्यांचे अनुकरण करण्यास भाग पाडले गेले. ब्रिटिश सरकारने १९३४ मध्ये मुंबई देवदासी संरक्षण कायदा लागू केला, परंतु त्याची अंमलबजावणी अयशस्वी झाली. आजही काही कुटुंबांचा असा विश्वास आहे की मुलीला असे देवाला वाहिल्यामुळे कुटुंबात भरभराट येते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो. मात्र यानंतर होणाऱ्या त्या मुलींचे हालअपेष्टा यांनी आता कळस गाठला आहे.
कर्नाटकमध्ये देवदासी प्रथा रोखण्यासाठी कायदा (कर्नाटक देवदासी (प्रतिबंध) कायदा) आहे, परंतु त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) ही प्रथा बंद करण्यासाठी काम करत आहेत. सरकारने देवदासींसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. ही देवदासी प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, शिक्षण, आर्थिक पाठबळ आणि सामाजिक जागरूकता यासह कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. गरिबी आणि सक्तीमुळे या प्रथेचा अवलंब करणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे काम केले पाहिजे. शिवाय, लोकांना हे समजून घेतले पाहिजे की ही प्रथा केवळ बेकायदेशीर नाही तर मुलींचे भविष्य देखील उद्ध्वस्त करते. देवदासी प्रथा ही एक जुनी परंपरा आहे जी कालांतराने शोषणाचे एक रूप बनली आहे. ही प्रथा केवळ कायद्याच्या विरुद्ध नाही तर मानवतेच्या विरुद्ध देखील आहे. ती नष्ट करण्यासाठी समाजाने एकत्र काम केले पाहिजे.