green color information and importance in marathi
नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा गजर आणि जागर करणार सण. घरातील आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री ही दैवी रुपातील आपली तारणहार असते. मग ती आईच्या स्वरुपात माया करणारी असो…बायकोच्या स्वरुपात भक्कम साथ देणारी असो…बहिणीच्या स्वरुपात पाठीशी उभी राहणारी असो.. किंवा मुलीच्या स्वरुपात निखळ प्रेम करणारी असो…प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ असतेच. पुढच्या पिढीचा वंश वाढवणारी ती स्वतः एक प्रकृतीचा अंश घेऊन वावरते.
हे जग निर्माण करणारी, ते रुजवणारी, वाढवणारी आणि सांभाळणारी प्रत्येक गोष्ट स्त्रीलिंगी गणली जाते. ती पृथ्वी, धरिणी, माती, प्रकृती आणि स्त्री या पुनोर्जन्म देणाऱ्या सुफल मानल्या जातात. निसर्ग आणि स्त्रीमध्ये अभूतपूर्व असे नाते आहे. जे सजृनशीलता आणि रजस्वाचे प्रतिक दर्शवते. श्रावण महिन्यामध्ये ज्या प्रमाणे निसर्ग हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे फुलतो तशीच स्त्री सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा चुडा घालते. हिरवी साडी नेसलेली स्त्री आणि हिरवी शाल पांघरलेली डोंगररांगा यांचं कौतुक तर नेहमीच केले जाते. हिरवा रंग निसर्गाचे देखील प्रतिक मानला जातो. सौभाग्याचं लेणं मानून स्त्री हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करतात. लग्नामध्ये तर हिरवी साडी घालणं ही अनेक ठिकाणी प्रथा आजही सांभाळली जाते. प्रत्येक सुवासनींच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा अगदी शोभून दिसतो.
हाच हिरवा रंग समृद्धतेचे प्रतिक आहे. ही समृद्धी फुललेल्या शेतमळ्यातून आणि बहरलेल्या फुलापानांतून दिसून येते. शिशिर ऋतु मध्ये झाडांची पानगळ झाल्यानंतर निसर्ग अगदी बोथट वाटू लागतो. त्यातील सुष्क काटे फक्त डोळ्यांना नाही तर मनाला टोचतात. पण वसंतानंतर फुललेला निसर्ग मन प्रसन्न करतो. पालवी पल्लवीत झाल्यानंतर व्यक्तींचं मनं देखील ताजीतवानी होतात. हे या हिरव्या निसर्गाची किमया आहे. माणसाने कितीही स्वतः सिमेंटच्या भिंतीमध्ये अडकवलं तरी माणसाला सुखावतो तो निसर्ग असतो. असे या हिरव्या रंगाचे महत्त्व आहे.
स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो. देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते. यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो. लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते. हा रंग पोषकता आणि शांतता दर्शवतो. हिरवा रंग हा मूळ रंगांपैकी एक आहे. याचाच अर्थ निसर्गनिर्मितीमध्ये तो अनादी काळापासून आहे. त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते. निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते. निसर्गासोबत घालवलेला काही काळ सुद्धा मनं सावरतो आणि बहरवतो. त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो.