“स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी” या कवितेच्याओळीत ग.दी. माडगूळकरांनी स्त्रियांचं जगणं मांडलं आहे. स्त्रीला विश्वाची जननी म्हणातात कारण तिच्याच उदरातून एक जीव जन्माला येतो. मात्र तिच्याच स्त्रित्वाची खूण असलेल्या मासिकपाळीला आजही खेड्यापाड्यातच नव्हे तर मोठ मोठ्या शहरातही विटाळ मानणारा एक वर्ग आहे. स्त्री शिकली पुढच्या पिढ्यांना शिकवलं पण तिच्या पाळीला मात्र आजही विटाळ मानलं जातं. महिलांची मासिक पाळी ही पवित्र की अपवित्र असा प्रश्न उभा राहतो.
पाळी आली की सुरुवातीचे तीन ते चार दिवस वेगळं बसवलं जातं देवघर, स्वयंपाकघरात त्या स्त्रीला येण्यास मज्जाव घातला जातो. इतकंच नाही तर स्त्रीशक्तीचं रुप असलेल्या देवीची करणं देखील अपशकुन मानला जातो. यालाच विरुद्ध बाजू म्हणजे देवी कामाख्या मंदिर. पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं की, पती भगवान शिवाचा अपमान करून देवी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली तेव्हा भगवान शिव तिच्या शरीरावर शोक करीत पृथ्वीभोवती फिरू लागले. भगवान शिवाच्या क्रोधामुळे होणारा विनाश टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे त्यांना शक्तीपीठ म्हणत. कामाख्या देवी मंदिरात माता सतीची योनी पडली होती. त्यामुळे या मंदिरात मातेच्या योनीची पूजा केली जाते. या मंदिरातील देवीला रक्तस्त्राव देवी असेही म्हणतात. कारण, देवी मातेला मासिक पाळी येते. याचकारणाने आसामच्या या कामाख्य़ा देवीच्या मंदिरात मासिकपाळी आलेल्या स्त्रियांची पुजा केली जाते. याचा अर्थ पुराणात देखील मासिक पाळीला विटाळ मानलेलं नाही.
याबरोबर आणखी संदर्भ जोडायचा झाला तर आषाढी वारी. आषाढी वारीमध्ये वारकरी लाखोंच्या संख्येने पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जातात. यात महिला देखील असतात. बीबीसी मराठीने याबाबात एक माहितीपट सादर केला होता. यात वारीा जाणाऱ्या महिलांनी असं सांगिलं होतं की, मासिक पाळी आली तरी देखील आम्ही वारी चुकवत नाही की अपूर्ण ठेवत नाही. वारकरी संप्रदायात मासिकपाळीला विटाळ मानत नाही. या महिलांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र आहे, ज्यामध्ये एका जीवाची उत्पत्ती होते त्याला विटाळ म्हणता येत नाही.
याबरोबर अजून संदर्भ द्यायचा झालाच तर कलर्स मराठी वाहिनीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेतही स्वामींचे मासिकपाळी बाबतचे विचार स्पष्ट केले आहेत. या मालिकेतील एका प्रसंगानुसार एका महिलेला पाळी आली असल्याने तिला बाजूला बसवलेलं असतं. स्वामी त्या महिलेला जेवण देतात. यावेळी अनेकांनी स्वामींच्या या वागण्याला विरोेध केला होता. त्यावेळी स्वामींनी त्या चार दिवसांचं महत्त्व सांगितलं होतं. पाळीच्या दिवसात महिलांना शारीरिक थकवा येतो म्हणून शेतीच्या आणि इतर कामातून त्यांना आराम मिळावा म्हणून चार ते पाच त्यांच्या हक्काच्या विश्रांतीसाठी असतात. मात्र याचा अर्थ मासिकपाळी विटाळ आहे असा होत नाही असं देखील या मालिकेतून स्वामींचे विचार दाखविण्यात आले होते. खरंतर मासिक पाळी हा विटाळ नाही.या दिवसात देवासमोर जायचं की नाही हा सर्वस्वी जिचा तिचा प्रश्न आहे, मात्र पाळी चालू असताना देवाची पुजा केल्याने कोप होतो ही अंधश्रद्धा आहे, असं या काही संदर्भातून दिसून येतं.