importance of orang color in marathi
नवरात्रीमध्ये नवदुर्गाची आराधना केली जाते. या शक्तीरुपी दुर्गेची पुजा आणि तिचा महिमा सांगितला जातो. दैवी शक्तीची उपासना केली जाते. देवींप्रमाणे आपल्या आसपास देखील अशा अनेक शक्तीरुपी स्त्रिया आहेत ज्या आपल्या रक्षणकर्त्या आहेत. जणू देवीनेच रुप घेऊन त्यांना आपल्या रक्षणार्थ पाठवले आहेत. नवरात्रीमध्ये नऊ रंग परिधान केले जातात. आज यातील केशरी रंग आहे. हा केशरी रंग वीरतेचे आणि शौर्याचे प्रतिक आहे. यातून सामर्थ्य आणि स्वातंत्र झळकते.
प्रभू रामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे. आपल्या भारत वर्षामध्ये या भगव्या झेंडाधरी लोकांनी अनेक वीर पराक्रम गाजवले आहे. युद्धावेळी रणागणांत या भगव्या झेंड्यांने अनेकांचा थरकाप उडवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पेरणी महाराष्ट्रामध्ये करत सुराज्य निर्माण केले. अटकेपार हा भगवा झेंडा नेऊन वीरतेने शौर्य दाखवले आहे. हा केसरी रंग म्हणजे प्रत्येकासाठी एक भावना बनला आहे. यामध्ये स्वराज्याची, सुराज्याची आणि वीरतेची भावना प्रबळ आहे. आपल्या तिरंगामध्ये सुद्धा हा केशरी रंग असून आपल्या लढ्याचे प्रतिक दर्शवतो आहे. हा लढा फक्त ब्रिटीश सैन्यापूरता मर्यादित नाही तर हा गुलामी आणि वाईट प्रवृत्ती विरोधात दिलेला लढा आहे. लाखो बलिदानानंतर तिरंगा अभिमान फडकतो आहे. या आपल्या शहीद जवानांची विरंगणा या केशरी रंगातून प्रकट होत आहे.
स्त्रियांमध्ये सुद्धा अशा अनेक वीरांगणा होऊन गेल्या आहेत. ज्यांनी आपले नाव इतिहासांच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या सर्व स्त्रियांनी स्त्री- पुरुष अशी विषमता मोडून स्वरक्षाणार्थ किंवा देशरक्षणार्थ प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे वीर झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपली वैयक्तिक दुखः मागे सारुन लक्ष्मीबाईंनी शत्रुंची अक्षऱशः झोप उडवली. एक स्त्री शासक किती सुस्थितीमध्ये राज्य सांभाळू शकते आणि वेळप्रसंगी शत्रूशी युद्धनितीमध्ये सरस ठरु शकते याचे उदाहरण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी घालून दिले. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी देखील सर्वोत्तम स्त्री शासक म्हणून संपूर्ण देशामध्ये नावलौकिक मिळवला. त्यांच्या राज्याला सुस्थितीमध्ये ठेऊन मंदिरांचा विकास केला. लोकोपयोगी कामे करुन आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने वारसदार होऊन अहिल्याबाईंनी आपली वीरता आणि चातुर्यता राज्यकारभारतून दाखवून दिली.
आता सुद्धा आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानी एक स्त्री शासक आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आत्ताच्या काळामध्ये देखील अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपले वेगळेपण आपल्या कार्यामधून दाखवून दिले आहे. राजकारणातील आतिशी मार्लेना, मायावती आणि ममता बॅनर्जी असो… किंवा खेळातील पी.टी.उषा, विनेश फोगाट किंवा मनु भाकर असो.. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या शौर्याने, कार्याने आणि कर्तुत्वाने नवे इतिहास रचले आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांनी आपली वीरांगणा दाखवून दिली आहे.
प्रिती माने