
pune pratham dagadusheth ganapti ganeshotsav 2024
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे शहराची ओळख आणि मान बनलेला आहे. जगातील कानाकोपऱ्यातून बाप्पांचे लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. दगडूशेठ गणपती बाप्पांची नेत्रदीपक खास मूर्ती पाहून भाविकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात. पण अनेकांना हे माहितीच नाही की, दगडूशेठ गणपतीची आत्ताची मूर्ती ही पहिली मूर्ती नाही. सध्या दगडूशेठ गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती तिसरी आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा म्हणून पहिल्यांदा विराजमान करण्यात आलेली मूर्ती ही शुक्रवार पेठेमध्ये आहे. हाच बाप्पा म्हणजे प्रथम दगडूशेठ गणपती.
शुक्रवार पेठेमध्ये अकरा मारूती कोपरा या ठिकाणी प्रथम दगडूशेठ गणपती आहे. इंग्रजांनी नगरशेठ असा मान दिलेल्या दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी गणपती बाप्पांची मूर्ती बनवून घेतली. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या आत्तापर्यंत तीन मूर्ती झाल्या आहेत. बाप्पांची पहिली मूर्तीची स्थापना 1893 साली तर दुसरी मूर्ती 1896 साली विराजमान करण्यात आली. तर आत्ता असणारी तिसरी मूर्ती ही 1968 साली बसवण्यात आली. आत्ताच्या दगडूशेठपेक्षा प्रथम दगडूशेठ मूर्ती वेगळी आहे. प्रथम दगडूशेठ मूर्ती नाचरी मूर्ती आहे. म्हणजे याचे मागील दोन्ही हात नाचत असल्याप्रमाणे आहेत.
फोटो – टीम नवराष्ट्र
प्रथम दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मूर्ती 1893 साली तेव्हाचे सूप्रसिद्ध मूर्तीकार बाबूराव नाईक यांनी घडवली. त्याकाळी ही घडवण्यासाठी 22 रुपये खर्च आला होता. ही मूर्ती पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आली आहे. यामध्ये कागदी लगदा आणि गुळ याचे मिश्रण वापरण्यात आले आहे. सुंदर अशी ही मूर्ती खरंच मूर्तीकारांचे कौशल्य दाखवत आहे. गणपतीचे डोळे देखील सुरेख असून ते काचेचे असल्याचा भास होतो.
प्रथम दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची आसनाची पद्धत आणि सोंडेमध्ये आत्ताच्या दगडूशेठ मूर्तीपेक्षा वेगळेपण दिसून येते. मात्र एका बाजूने पाहिले तर दोन्ही मूर्त्यांमध्ये अगदी हुबेहूब असल्याचे दिसून येते. तसेच प्रथम दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मूर्तीचा मुकट देखील वेगळा होतो. मुकट वेगळा काढल्यानंतर केसांचा मधला भांग असलेले दिसून येते. सहसा कोणत्याही मूर्तीचा असा वेगळा मुकूट काढता येत नाही. पण प्रथम दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीचे आणि मूर्तीकाराच्या कलेचे वेगळेपण आहे. या प्रथम दगडूशेठ बाप्पांची प्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांकडून करण्यात आली होती. अनेक पुणेकर दगडूशेठ बाप्पांच्या या पहिल्या मूर्तीबाबत अनभिज्ञ आहेत.