Russian woman Nina Kutina 40 overstayed her visa and lived in Gokarna’s forests since 2016
Nina Kutina : उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्णच्या घनदाट जंगलांमध्ये नुकतीच एक थरारक घटना उघडकीस आली आहे. रामतीर्थ टेकडीच्या पायथ्याशी, समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटर उंचीवर असलेल्या एका अंधाऱ्या, धोकादायक गुहेत पोलिसांना एक रशियन महिला आणि तिच्या दोन लहान मुली सापडल्या. जंगलात वसलेल्या या गूढ गुहेतील वास्तवावर कोणीही सहज विश्वास ठेवणार नाही!
ही रशियन महिला आहे नीना कुटीना उर्फ मोही, वय ४० वर्षे. ती २०१६ मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. व्हिसाची मुदत संपल्यानंतर देश सोडण्याऐवजी तिने गोकर्णच्या जंगलातच आपले ‘नवजीवन’ सुरू केले. सुमारे आठ वर्षांपासून ती या गुहेत वास्तव्यास होती पूर्णपणे एकटी, फक्त निसर्गाच्या सहवासात आणि सापांच्या सान्निध्यात.
नीनाच्या या विलक्षण जीवनात सर्वात मोठा धक्का म्हणजे, तिने तिच्या दोन्ही मुलींना ६ वर्षांची प्रेया आणि ४ वर्षांची अमा रुग्णालयात नव्हे, तर गुहेतच जन्म दिला. डॉक्टरांची मदत न घेता, जंगलातील चिखल, दगड आणि पक्ष्यांच्या गोंगाटात तिने आपल्या लेकींचे संगोपन केले. त्यांना तिने योग, ध्यान, चित्रकला आणि अध्यात्म शिकवले. ती आणि तिच्या मुली प्लास्टिकच्या चादरींवर झोपायच्या, सूर्यप्रकाशात उठायच्या आणि चंद्रप्रकाशात ध्यान करत असत. नीनाच्या मते, हे आयुष्य ‘तपश्चर्येचा अनुभव’ होते. तिने जंगलातील फळे, पाने, फुले, औषधी वनस्पतींसह काही पॅक अन्न आणि इन्स्टंट नूडल्सवर आपली उपजीविका चालवली.
हे देखील वाचा : World Snake Day: साप म्हणजे धोका नाही तर पर्यावरण रक्षक; जाणून घ्या का पृथ्वीवर महत्त्वाचे आहे त्याचे अस्तित्व
नीना म्हणते, “साप माझे मित्र आहेत. त्यांना छेडल्याशिवाय ते कधीच हानी करत नाहीत.” गुहेत रशियन धार्मिक पुस्तके, रुद्राची मूर्ती, शिवलिंग, कृष्णाच्या प्रतिमा आणि ध्यानासाठी वापरलेले चिन्ह सापडले. हे दृश्य पाहून पोलिसही थक्क झाले. ९ जुलै रोजी पोलिसांच्या नियमित गस्तीत गुहेबाहेर साड्या आणि प्लास्टिकचे कव्हर्स दिसले. संशय आल्यावर त्यांनी गुहेत प्रवेश केला आणि तिथे हे संपूर्ण दृश्य उलगडलं. नीना आणि तिच्या मुली त्या काळोखात साधेपणाने राहात होत्या.
पोलिस अधीक्षक एम. नारायण यांच्या मते, हा परिसर अतिशय धोकादायक आहे. येथे सापांचे प्रमाण जास्त आहे, शिवाय मागच्यावर्षी मोठे भूस्खलनही झाले होते. आश्चर्य म्हणजे, या संकटांमध्येही नीना आणि तिच्या मुली सुरक्षित राहिल्या. पोलिस तपासात समोर आले की, नीना काही काळासाठी २०१८ मध्ये परवानगी घेऊन नेपाळला गेली होती. मात्र पुन्हा भारतात आली आणि जंगलातच वास्तव्यास राहिली. सध्या तिला आणि तिच्या मुलींना कुमटा तालुक्यातील एका आश्रमात ठेवण्यात आले आहे, जिथे एक वृद्ध स्वामीजी त्यांची काळजी घेत आहेत.
नीनाच्या जवळपासून पोलिसांनी पासपोर्ट आणि कालबाह्य झालेला व्हिसा जप्त केला आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रशियन दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असून, प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू आहे. नीनाच्या जीवनशैलीमागे कृष्णभक्ती आणि ध्यानाचा हेतू होता. पोलिसांनी तिला गुहेत मूर्तीपूजा करतानाही पाहिले. ती जिथे राहत होती त्या गुहेत एक छोटं शिवलिंग आहे. ही गुहा ‘गौ गर्भ’ म्हणून प्रसिद्ध आहे आणि येथे वटवाघळेही राहतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीशिवाय जीवन? खगोलशास्त्रात मोठा शोध; ‘TOI-1846b’ या प्राचीन ग्रहावर पाणी असल्याचे संकेत
नीनाची ही कथा केवळ गूढ नव्हे, तर एका स्त्रीच्या अध्यात्मिक शोधाची कहाणी आहे. सापांमध्ये राहून, जंगलात मुलींचं संगोपन करणं आणि ध्यानात रमणं हे सर्व काही कल्पनेपलिकडचं आहे. ही ‘जंगल साध्वी’ आता आपल्या मातृभूमीकडे परतते आहे. पण तिच्या मागे सोडून जाते आहे ती एक अशी कथा, जी अनेकांना आध्यात्मिकतेचा आणि निसर्गाच्या सामर्थ्याचा नवा अर्थ शिकवून जाते.