
white color information and importance in marathi
नवरात्रीमध्ये स्त्री शक्ती पुजली जाते. रोजच्या आयुष्यात विविधांगी रुपाने ‘ती’ आपली शक्ती म्हणून राहत असते. तिच्या अस्तित्वामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात बहर येतो…आयुष्य रंगून जाते. कधी ती महाकाली असते…तर कधी योगेश्वरी असते…कधी ती लक्ष्मी असते…तर कधी ती सरस्वती असते. तिची प्रत्येक रुपं तारणहार आणि रक्षणकर्ती असतात. आज सरस्वतीच्या रुप दर्शवणारी ती पांढऱ्या रंगामध्ये दिसून येत आहे. हा पांढरा रंग म्हणजे शुद्धतेचा आणि शांततेते प्रतिक आहे. पांढरा हा निर्मळतेचा आणि पवित्रतेचा द्योतक आहे.
पांढरा रंग हा पाण्यासारखाच नितळ आहे. चंद्रासारखा तेजस्वी आहे तर मोत्यासारखा मौल्यवान सुद्धा आहे. हा रंग सर्व समावेशक असून सर्वांना आपल्यामध्ये सामील करुन घेणारा आहे. प्रत्येक स्त्री देखील अशीच सर्वांची सुखदुःख सामावून घेणारी असते. मात्र तिची दुःख जाणारी फार थोडी संवेदनशील मनं असतात. तिने प्रत्येक नात्याला भरभरुन प्रेम आणि माया दिली तरी तिच्यावर बंधन घालणारे हातच जास्त असतात. प्रत्येक टप्प्यावर तिला रोखणारे आणि मर्यादा घालण्याचा प्रयत्न करणारे जास्त लोक असतात. यामधील एक भयानक आणि तिच्या अस्तित्वाला ठेच पोहचवणारी प्रथा म्हणजे विधवा म्हणून तिला हिणवणे.
विधवा स्त्रीचे अस्तित्व समाजाकडून आजही नाकारले जाते. तिचे नवऱ्याव्यतिरिक्त आणि नवऱ्याशिवाय आयुष्य आहे, हे अजून समाज मानायला तयार होत नाही. जुन्या प्रथा परंपराचा पगडा असलेल्या ठिकाणी तर हे प्रकार अधिक तीव्रतेने जाणवतात. शहरी भागांमध्ये याचे प्रमाण कमी असले तरी खेड्यागावांमध्ये आजही विधवा स्त्रीवर अनेक बंधने घातली जातात. तिला पांढरी साडी घालण्यास सांगितले जाते. तिचा क्षृंगार करण्याचा अधिकार काढून घेतला जातो. एवढचं काय तर तिला हळदी कुंकू लावण्याचा देखील हक्क दिला जात नाही.
बंधनांच्या विळख्यात अडकलेली विधवा स्त्री ही अबला होऊन जाते. हळदी कुंकूचा हक्क हा लग्न आधी कुमारिकेला देखील असतोच. मात्र नवरा गेल्यानंतर तो पूर्णपणे काढून घेतला जातो. हिरवा चुडा नाही की रंगीत साड्या नाहीत. तिच्या आय़ुष्यातील एक प्रकारे रंगचा उडालेला असतो. किंबहूना तो रंग काढून घेतलेला असतो. शुभकार्यातून आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून तिला वगळले जाते. एका प्रकारे तिचे सामाजिक अस्तित्व नाहीसे करण्याचा प्रयत्न केला जातो.
विधवा होणे हे कोणी मागून घेत नाही, पण ते आलंच म्हणजे ‘ती’ संपली असं होत नाही. समाजाच्या बंधनांमुळे ती अगदी कोमेजून जाते. कधीकाळी शुद्धतेचा आणि निर्मळतेचे प्रतिक असलेला हा पांढरा रंग विधवेच्या आयुष्याची मात्र राख करतो. तिला तो अक्षरशः नकोसो होतो. मग ना तिला मोती हवा असतो ना चंद्र…तिला हवा असतो तो फक्त मोकळा श्वास…समाजाच्या बंधनाशिवाय…
– प्रिती माने