YouTuber ऐश्वर्या पेवाल नेमाडेचा प्रवास
मुंबई/श्रद्धा पोटफोडे-सोनावणेः आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्टाशिवाय व्यक्तिमत्त्व घडत नाही. आजच्या स्पर्धेच्या काळात स्वतःवर प्रेम करण्यासोबतचं, आपली आवड जपताना आपली जबाबदारी कशी सांभाळायची? जगातील प्रत्येक महिला, स्त्री, आणि त्यासोबत प्रत्येक पुरुषाने स्वतःवर प्रेम का करावं आणि मानसिक आरोग्य कसं जपावं याबद्दल सांगतेय, एकेकाळी मुंबई माहित नसलेली पण आता संपूर्ण महाराष्ट्राची शॉपिंग सखी आणि नवराष्ट्रची नवदुर्गा – प्रसिद्ध यूट्यूबर ‘ ऐश्वर्या पेवाल – नेमाडे. ‘
असं म्हणतात की, एक मुलगी शिकली की संपूर्ण घराची प्रगती होते, आणि त्यासाठी संपूर्ण कुटुंबाचं पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. एकेकाळी मुंबई माहित नसलेली अलिबागची ऐश्वर्या पेवाल आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध शॉपिंग आणि लाईफस्टाईल यूट्यूबर म्हणून ओळखली जाते. घरापासून लांब राहून शिक्षण आणि त्यानंतर जे शिक्षण घेतलं ते सार्थकी लावण्याची वेळ आल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं आणि मग सुरुवात झाली मंत्रालयापासून ते नंतर सकाळ, लोकमत आणि आता स्वतःच यूट्यूब चॅनेल आणि बिझनेस.
आयुष्याला मिळाली योग्य दिशा
प्रत्येक मुलीला तिच्या घरातून मिळणारं पाठबळ आणि शिस्त ही आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम करतं. पेशाने आर्मी ऑफिसर असलेले ऐश्वर्याचे वडील ‘ दुर्गादास पेवाल ‘ जेवढे शिस्तप्रिय तेवढंच आजच्या काळाला अनुसरून मुलाला आणि मुलीला सोबत शिक्षण आणि करियर करण्याची मोकळीक देणारी आई ‘ रेश्मा पेवाल ‘ उत्तम पालक देखील ठरले. क्षेत्र कोणतंही असो.. घरच्याचं पाठबळ मिळालं की कष्टाला विश्वासाची उत्तम जोड मिळते आणि आत्मविश्वास टिकवण्याची ताकद मिळते. याचं आत्मविश्वासाने सर्वांची ड्रीम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत येऊन ऐश्वर्याने तिचं पत्रकारितेचं स्वप्नं साकार केलं.
कशी मिळाली संधी
मुंबई युनिव्हर्सिटी मधून bmm journalism मधून पत्रकारितेची डिग्री घेतल्यानंतर, मुळातचं आवाज चांगला असल्याने त्याची पारख करून वडिलांच्या सांगण्यावरून व्हॉईस ओव्हरचा कोर्स केला आणि त्यानंतर व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून मंत्रालयातून पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात झाली. आई वडिलांसोबत सर्वात मोठा पाठीराखा असतो तो मोठा भाऊ, आणि आपल्या घरातील आपली मुलगी एक प्रगतशील वाटचाल करते आहे, तर भाऊ ‘ वैभव पेवालची ‘ खूप मोठी साथ तिला लागली, कारण आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना, जेव्हा आपलं कोणी नसतं , आई वडीलांना सगळं सांगता येत नसतं तिथं दादाचं आपला मित्र बनतो आणि योग्य वाट दाखवतो.
ऐश्वर्याचा प्रवास
मंत्रालयानंतर, सकाळच्या YIN मध्ये टीम लीड करण्याची संधी आणि नंतर एका मराठी वृत्तपत्राच्या डिजिटलचा प्रवास करून सर्वांसमोर आली – हाय, हॅलो, नमस्कार – ” मी ऐश्वर्या पेवाल ” म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला तिने आपलंस केलं. गृहिणींची मैत्रीण, आणि शॉपिंगच्या दुनियेतील सर्वात राणी. अगदी दीडशे – दोनशे रुपयांच्या कपडे, वस्तू, घरगुती वस्तूंपासून ते दीड लाखांच्या पैठणीपर्यंत पोहचलेला ऐश्वर्या पेवालचा प्रवास आताच्या काळातील पत्रकारिता क्षेत्रात नुकतच पाऊल ठेवलेल्या आणि नवीन लग्न झालेल्या तसेच प्रत्येक गृहिणींसाठी प्रेरणादायी आहे.
लग्नानंतर बदललेलं आयुष्य
लग्न झाल्यानंतर स्त्रीसोबत पुरुषांचंदेखील आयुष्य बदलतं, आणि आताच्या बदलत्या काळात, बदलत्या मूड मूडनुसार करियर आणि नाती सांभाळणं अवघड होऊन जातं. जेव्हा घरातील स्त्रीसुद्धा बाहेर कामाला जाते तेव्हा तिच्या आयुष्यात घडणारे किस्से आणि बदल याचा परिणाम नकळत घरात आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील होत असतो. यावर आपलं मत मांडताना ऐश्वर्या म्हणते – “ऑफिसमध्ये टिपिकल मॅरिड गॉसिप्स टाळायच्या , यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बाद होऊ शकते. ” कारण याचा परिणाम नकळत आपल्या नात्यांवर होतो, आणि मानसिकरित्या माणूस खचून जातो.
लग्नानंतर मोठा निर्णय
लग्नानंतर ऐश्वर्याला सुद्धा या परिस्थितीतून जावं लागलं आणि करियर सोडून घरी बसावं का हा विचार मनात आला असताना तिने उचललेलं पाऊल आज तिच्या यशामागचं खूप मोठं कारण आहे. कारण, लग्न झाल्यानंतर ऐश्वर्याला तिच्या पार्टनरकडून, तिचा नवरा अर्थात – ओमकार नेमाडेकडून मिळालेला पाठिंबा आणि त्यातून सुरू झालेली तिची बिझनेसचा प्रवास ही नक्कीच आताच्या काळातील प्रत्येक नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी उत्तम उदाहरण आहे. कारण एकमेकांवर असलेला विश्वास आणि माझ्या कामावर माझं प्रेम आहे ही भावना जेव्हा प्रबळ होते तेव्हा कोणतीच गोष्ट तुम्हाला ते यश गाठण्यापासून रोखू शकत नाही.
स्वतःचा बिझनेस सुरू करून या डिजिटल युगातील स्त्रीने स्वतःचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व घडवलं आहे. आपण कामाला नाही तर काम आपल्याला शोधत आलं पाहिजे, आणि ते केवळ शक्य आहे, कामावरच्या एकनिष्ठेमुळे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या पेवाल नेमाडे.
गृहिणीला आपलीशी वाटणारी युट्युबर
कारण ती फक्त यूट्यूबर नाही, तर प्रत्येकाच्या घरातील प्रत्येक स्त्रीची मैत्रीण असावी अशी तिने स्वतः निर्माण केलेली तिची ओळख आहे. एखादी वस्तू घ्यावी तर ती का घ्यावी, त्याचे फायदे – तोटे आणि सोबतच ज्याचा व्यवसाय आहे त्याची सगळीकडे होणारी मार्केटिंगसुद्धा योग्य प्रकारे ती हाताळते आणि समजावून सांगते, म्हणूनच ती प्रत्येक साध्या गृहिणीला आपलीशी वाटते.
काम सांभाळताना होणारा मानसिक त्रास सोबत आत्मविश्वास खचला जातो तेव्हा स्वतःला कसं सांभाळायचं ? तर याबद्दल सांगताना ऐश्वर्या म्हणते – जोवर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोवर काहीच शक्य नाही. प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाने आत्मसन्मान केला पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. जग काय म्हणेल याकडेचं नेहमी लक्ष दिलं तर होणारं मानसिक खच्चीकरण आपल्याला खूप त्रास देतं आणि त्याचसाठी प्रत्येक स्त्रीने चिडचिड कमी करावी आणि स्वतःवर प्रेम करावं.
स्वतःची आवड जपणारी जर्नलिस्ट
लाईफस्टाईल जर्नलिस्ट आणि यूट्यूबर याशिवाय ऐश्वर्या पेवाल ही भरतनाट्यम आणि लावणीसाठी ‘ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची ‘ मानकरी असून सध्या कथ्थक विशारद आहे, शिवाय ९ ते १० वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूज काम करत असल्यामुळे तिला महाराष्ट्राची उत्तम पत्रकार म्हणून तिचा सन्मान देखील मिळाला आहे. आताच्या डिजिटल युगात वावरताना, करियर आणि मानसिक आरोग्य कसं जपावं याबद्दल बोलताना ऐश्वर्याने तिचं प्रवास सांगितला आणि उदयास येणाऱ्या नव्या महिला पत्रकारांसाठी आणि सर्व वर्किंग महिलांसाठी नवरात्रीनिमित्त एक नवा आदर्श नवराष्ट्र डिजिटलने सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.