38th National Sports Competition On the Last Day in Gymnastics Sanyukta Kale and Parina Madanpotra Got one Gold and one Silver Each
देहरादून : राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर असलेल्या भागीरथी संकुलात आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्राच्या महिला जिम्नॅस्ट्सनी गाजविला. स्पर्धेतील आजचा शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. वैयक्तिक साधन प्रकारातील क्लब या क्रीडा प्रकारात परिणा हिने सुवर्णपदक जिंकताना २५.६०० गुणांची नोंद केली. सोळा वर्षीय खेळाडू परिणा हिचे या स्पर्धेतील हे पाचवे पदक आहे. तिने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण व दोन कास्यपदक जिंकली आहेत. ती मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात शिकत असून तिला ज्येष्ठ जिम्नॅस्ट्स वर्षा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परिणा हिने या स्पर्धेतील रिबन या प्रकारात कांस्यपदक जिंकले. या प्रकारातील झुमका गिरा रे या गाण्याच्या तालावर सुरेख रचना सादर केल्या होत्या. तिला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पाचवे स्थान मिळाले होते.
दोन्ही प्रकारात सुवर्णपदकाची खात्री
क्लब व रिबन या दोन्ही प्रकारात सुवर्णपदकाची खात्री होती. रिबन या प्रकारात माझे सुवर्णपदक हुकले परंतु माझी सहकारी संयुक्त हिला हे विजेतेपद मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे सांगून १६ वर्षीय खेळाडू परिणा म्हणाली, ” आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे हे ध्येय साकार करण्यासाठी मी भरपूर कष्ट करणार आहे.
संयुक्ताला ‘संयुक्त’ विजेतेपद
रिबन या प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता हिला जम्मू-काश्मीरची खेळाडू मुस्कान राणा हिच्या समवेत संयुक्त सुवर्णपदक देण्यात आले. खरंतर मुस्कान हिची कामगिरी चांगली झाली नव्हती रिबन उचलताना ती पडली होती तसेच एकदा तिची रिबन अंतिम रेषेच्या बाहेर गेली होती. याउलट संयुक्ता हिने माऊली माऊली या गाण्याच्या तालावर सुरेख रचना सादर केली होती. ती एकदाही पडली नाही तसेच तिची रिबन कधीही अंतिम रेषेच्या बाहेर गेली नाही. मात्र पंचांनी मुस्कान हिला सुवर्णपदक तर संयुक्ता व परिणा यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक जाहीर केले.
महाराष्ट्र संघाची रितसर तक्रार
त्यामुळे महाराष्ट्र संघ व्यवस्थापनाने रीतसर तक्रार नोंदवली. त्यानंतर तीन आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीने सर्व खेळाडूंचे व्हिडिओ पुन्हा पाहिल्यानंतर मुस्कान व संयुक्त यांना संयुक्तपणे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. त्या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी २५.५५० गुण देण्यात आले.रौप्य पदक कोणालाही न देता परिणा हिला जम्मू-काश्मीरच्या मान्या शर्मा हिच्या साथीत संयुक्त कास्यपदक देण्यात आले. त्यांचे प्रत्येकी २३.४५० गुण झाले.
वयाच्या पाचव्या वर्षापासून जिम्नॅस्टिक्समध्ये करिअर
संयुक्ता ही वयाच्या पाचव्या वर्षापासून जिम्नॅस्टिक्समध्ये करिअर करीत असून येथे तिने दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली. आजपर्यंत तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरावर दीडशेहून अधिक पदके जिंकली आहेत. ठाण्याची ही १८ वर्षीय खेळाडू पूजा व मानसी सुर्वे या भगिनींच्या मार्गदर्शना खाली सराव करीत आहे.
सुवर्णपदक जिंकण्याच्या मला आत्मविश्वास
सुवर्णपदक जिंकण्याच्या मला आत्मविश्वास होता कारण या स्पर्धेसाठी मी भरपूर तयारी केली होती. माझी सहकारी परिणा हीदेखील पदकाच्या व्यासपीठावर उभा राहिल्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे असे संयुक्ता हिने सांगितले. ती पुढे म्हणाली,” अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे येथील सोनेरी कामगिरी माझ्या भावी कारकिर्दीसाठी अनुभवाची शिदोरीच आहे.
बॅंलसिंग बीम प्रकारात शताक्षीला रौप्यपदक
बॅंलसिंग बीम प्रकारात शताक्षी टक्के हिने अप्रतिम कौशल्य दाखवले त्यामध्ये वुल्फ टर्न हा अवघड प्रकार सादर केला. तिने ११.०६ गुण मिळविले. पश्चिम बंगालच्या रितू दास हिने ११.३६७ गुण मिळवित सुवर्णपदक जिंकले. शताक्षी ही पुण्यामध्ये इन्फिनिटी क्लब येथे मानसी शेवडे व अजित जरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आजपर्यंत तिने खेलो इंडिया स्पर्धेत अनेक स्पर्धांमध्ये भरपूर पदके जिंकली आहेत.
बारावी परीक्षेला दांडी अन् रौप्यपदकाची कमाई
परीक्षेला दांडी मारण्याबाबत आई-वडिलांनी होकार दिल्यामुळेच मी येथे स्पर्धेत भाग घेऊ शकले. परीक्षेचा कालावधी व स्पर्धेचा कालावधी एकाच वेळी आल्यानंतर अर्थातच स्पर्धेला प्राधान्य दिले त्यामुळेच मला पदकाच्या व्यासपीठावर उभे राहता आले असे शताक्षी हिने सांगितले. महाराष्ट्राने यंदा जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात १२ सुवर्ण,८रौप्य व ४ कास्य अशी २४ पदकांची कमाई केली.