जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यात शनिवारी “अहिल्या दौड” चे आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या वतीने प्रथमच ही विशेष दौड आयोजित करण्यात आली. या दौडमध्ये शेकडो ठाणेकरांनी सहभाग घेतला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार केला. अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, प्रशासन आणि लोककल्याणासाठी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. त्यांनी मंदिरे, धर्मशाळा बांधण्याबरोबरच औद्योगिक धोरणे आखून लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे प्रेरणादायी कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ वाजता या दौडला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या वेळी समारोह समितीच्या अध्यक्ष व अहिल्यादेवींच्या वंशज ॲड. रुचिका शिंदे, उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्यवाह प्रफुल्ल शिंदे, लेक सिटी स्पोर्ट्स क्लबचे प्रमोद वाघमोडे, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन खेळाडू कुमारी अदिती राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू उपस्थित होते. या दौडमध्ये ६०० हून अधिक महिला, शाळकरी मुली तसेच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, राष्ट्रसेविका समिती ठाणे महानगर, महिला समन्वय समिती यांसारख्या विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला आणि तरुणींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
या दौडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत सजलेल्या मुलींनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या पारंपरिक पोशाखाने ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळाला. तसेच, मशाल घेऊन संचालन करणाऱ्या शाळकरी मुलांनी दौडच्या वातावरणात अधिक उत्साह निर्माण केला. मावळी मंडळाच्या राष्ट्रीय खेळाडू संस्कृती पारकर हिचे दांडपट्टा आणि सिलंबन यांसारख्या युद्धकलेचे प्रात्यक्षिकही या वेळी सादर करण्यात आले. या प्रदर्शनामुळे ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधिक ठळकपणे समोर आली.
दौड मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथून मोठ्या जल्लोषात सुरू झाली. मार्गक्रमण करताना दौड दगडी शाळा, गजानन महाराज मंदिर, तीन पेट्रोल पंप, घंटाळी, मासुंदा तलाव, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशा महत्त्वाच्या ठिकाणी गेली आणि अखेर स्मारकाजवळ तिचा समारोप झाला. या दौडमध्ये महिलांसह शाळकरी मुली, युवक, विविध सामाजिक संस्था आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांच्या सहभागामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. समारोपाच्या वेळी समारोह समितीच्या अध्यक्ष ॲड. रुचिका शिंदे यांनी या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी धावपटू, आयोजक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या संस्था यांचे आभार मानले. त्यांनी भविष्यातही महिलांना प्रेरणा देणारे आणि इतिहास जागवणारे असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे आश्वासन दिले.