MCA President Anjikya Naik
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Mumbai Cricket Association President Election) पार पडली. क्रिकेट विश्वामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा दबदबा आहे. BCCI नंतर MCA चे क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांचा विजय झाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळाली आहेत. संजय नाईक यांना 114 मतं मिळाली आहेत. अजिंक्य नाईक यांना 107 मतांनी विजय मिळाला आहे. त्यांनी महायुती पुरस्कृत संजय नाईक (Sanjay Naik) यांचा 107 मतांनी पराभव केला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. अजिंक्य नाईक वयाच्या 38 व्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. या विजयांनतर अजिंक्य नाईक यांनी हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं.
या नेत्यांचा होता निवडणुकीत अदृश्य हात, लावली होती ताकद
अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्यानिमित्तानं आशिष शेलार संजय नाईक यांच्यासाठी ताकद लावताना पाहायला मिळाले. तर, अजिंक्य नाईक यांच्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद विभागली गेलेली होती.
MCA करिता यांचे होते मतदान
अजिंक्य नाईक यांनी विजयानंतर आमच्या मैदान क्लब, क्रिकेटर्स, शाळा आणि कॉलेज, क्लब सेक्रेटरी यांचा विजय आहे. ही दुखाची निवडणूक आहे. हा जो विजय आहे तो खरंतर अमोल काळेंचा विजय आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी निवडणूक लढलो होतो. शरद पवार आणि इतर पक्षातील राजकीय नेते यांचे आभार मानतो. क्रिकेटसाठी काम सुरु ठेवणार आहे. माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,असं अजिंक्य नाईक म्हणाले.
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी किती मतदान झालं?
आज एमसीएच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. एमसीएच्या एकूण 375 मतदारांपैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाकरिता प्रतिष्ठेची झालेली निवडणूक प्रक्रिया एमसीएच्या मुख्यालयात पार पडली होती. अजिंक्य नाईक आणि संजय नाईक हे अध्यक्षपदासाठी एकमेकांच्यासमोर उभे ठाकले होते. यामुळं निवडणुकीत रंगत आली आहे. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं.
एमसीएचे मतदार कोण आहेत?
मैदान क्लब : 211
ऑफिस क्लब : 77
शाळा, महाविद्यालय : 37
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू : 50
एकूण मतदार : 375
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र
मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.त्यामुळे त्याचं अध्यक्षपद मिळवणं ही देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट मानली जाते.