
आशिया चषक २०२३ : भारताच्या संघाने आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यांमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला आहे आणि आशिया चषक भारताच्या नावावर केला आहे. भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाज पत्त्यांसारखी कोसळली. श्रीलंकेचा पराभव करत भारताने पाच वर्षांनंतर आशिया कपवर नाव कोरलं. भारताच्या संघाने २६३ चेंडू राखून श्रीलंकेवर विजय मिळवत नवा विक्रम रचला. या दमदार विजयानंतर विजेत्या संघाला बक्षिस म्हणून मोठी रक्कम देण्यात आली आहे. आशिया चषक फायनलच्या सामन्यांमध्ये भेदक मारा करून सहा विकेट्स घेऊन मोहम्मद सिराजला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (Player of The Match) पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेला भारताच्या संघाने फक्त ५० धावांमध्ये ऑलआऊट केलं. श्रीलंकेचे अवघ्या १५.२ षटकांत सर्व गडी बाद झाले. भारताने ५१ धावांचं लक्ष्य केवळ ६.१ षटकांत पूर्ण केलं आणि दणदणीत विजय मिळवला. आशिया चषक २०२३ विजेत्या टीम इंडियाला १,५०, ००० डॉलर्स (US$) बक्षीस म्हणून मिळाले. १,५०,००० यूएस डॉलर्स म्हणजे १,२४,६३,५५२ रुपये. आशिया कप २०२३ मध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कुलदीप यादवला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला. आशिया कप २०२३ मध्ये कुलदीप यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात चार बळी घेतले होते.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कुलदीप यादवला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब देण्यात आला. यासोबत त्याला १५,००० यूएस डॉलर्स म्हणजे सुमारे १२,४६,३५५ रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या वतीने, श्रीलंकेच्या मैदानी स्टाफ म्हणजेच ग्राउंड्समनला त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बक्षीस म्हणून ५०,००० डॉलर्स (US$) रक्कम म्हणजे सुमारे ४१,५४,५१७ रुपये देण्यात आली. अंतिम सामन्यातील विजयी कामगिरीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार (Player of The Match) देण्यात आला. मोहम्मद सिराजला यासोबत म्हणून ५,००० डॉलर्स (US$) म्हणजे सुमारे ४,१५,४५१ रुपये बक्षीस मिळाले. महत्त्वाचं म्हणजे सिराजने हे रोख बक्षीस ग्राउंड्समनला देण्याचा मोठा निर्णय घेतला. कोलंबोमध्ये आशिया कप 2023 दरम्यान पावसामुळे ग्राऊंड्समननी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची आठवण आणि कौतुक म्हणून सिराजने बक्षीसाची रक्कम ग्राउंड्समनला दिली. सिराजच्या या दानशूरपणाचं खूप कौतुक होत आहे.