
Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने 'एशियन गेम्स 2026'च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा
नागोयाच्या मिजुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियममध्ये शनिवारी २० व्या आशियाई स्पर्धेचे (Asian-Games) भव्य उद्घाटन पार पडले. या खास क्षणी संपूर्ण आशियातील खेळाडू एकत्र जमले होते. त्यांच्या उपस्थितीत आशिया खंडातील सर्वात मोठ्या खेळाच्या महाकुंभाला अशाप्रकारे सुरुवात झाली आहे.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान स्टेडियममध्ये रंगेबीरंगी रोशनाई व शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत व उत्साहाच्या या वातावरणात पदक तालिका व सामन्यांची चर्चा काही अंशी मागे पडली होती, तर प्रत्येक खेळाडू व उपस्थित क्रीडा रसिकांनी या ऐतिहासिक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला. जपानचे सम्राट नारुहितो यांनी आयची-नागोयामध्ये आशियाई स्पर्धेच्या २० व्या हंगामाच्या सुरुवातीची घोषणा केली. अशाप्रकारे या स्पर्धेची औपचारिक सुरुवात झाली असून पुढील दोन आठवड्यात येथे हजारो अॅथलेटिक्स येथे भाग घेतील.
स्टेडियममध्ये भारतीय पथकाचे नेतृत्त्व दोन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील अॅथलेटिक्सने केले. ऑलिम्पिक पदक विजेता मनु भाकर आणि कबड्डी स्टार पवन सेहरावत यांच्याकडे भारतीय ध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला होता. संपूर्ण परिसरात या जोडीने हातात ध्वज घेत दिमाखात तिरंगा फडकवला. यावेळी भारतीय क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या कडकट्यात त्यांचे स्वागत केले.
भारतीय पथक नागोयाला जरी पोहचला असला, तरी हांगझोऊमधील त्यांच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत १०७ पदक पटकावली होती, ज्यात २८ सुवर्ण पदकांचा समावेश होता. त्या कामगिरीने भारतीय पथकावर चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, प्रत्येक आशियाई स्पर्धेची एक वेगळी कथा असते. काही अध्याय परिचित विजेत्यांच्या नावे असतात. तर काही वेळा एखादा नवा खेळाडू उत्तुंग भरारी घेत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याच्या प्रयत्नात असतो. आता याच महाकुंभाचा आनंद येत्या दोन आठवड्यात आशिया खंडातील क्रीडारसिकांना घेता येणार आहे.