aquib Nabi
श्रीलंकेविरुद्धच्या संघात आकिबचा समावेश होता, पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका न्यूझीलंडच्या भूमीवर होणार असल्याने भारतासाठी ती खूप कठीण आहे, कारण न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकेत त्यांना हरवणे सोपे काम नाही. अशा परिस्थितीत, बीसीसीआय न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकिब नबीला इंग्लंडमध्ये २-३ कसोटी काउंटी क्रिकेट सामना खेळवण्याचा विचार करत आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय इंग्लिश काउंटी संघांशी चर्चा करत आहे.
आकिबने २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मीर संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४३ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये १६२ फलंदाजांना बाद केले आहे. तसेच, त्याने ३६ लिस्ट ए सामन्यांमध्ये ५६ विकेट्स घेतले आहेत. याशिवाय त्याने ३९ टी२० सामन्यांमध्ये ४३ विकेट्स घेतले आहेत.आकिबने अद्याप भारतीय संघात पदार्पण केलेले नाही, परंतु त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती वेगवान गोलंदाजांना रेड- बॉल क्रिकेट खेळायला मिळावे याची खात्री करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे, आकिब नबीसाठी इंग्लंडमध्ये काही काउंटी सामने आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय आकिबसाठी इंग्लंडमध्ये किमान दोन ते तीन रेड- बॉल सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. हे त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.’ इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील परिस्थिती वेगळी असली तरी, न्यूझीलंडच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीमुळे नबीचा इंग्लंडमधील रेड- बॉलच्या क्रिकेटचा अनुभव फायदेशीर मानला जात आहे.
न्यूझीलंड आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी, तर दुसरा सामना २७ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डब्ल्यूटीसी २०२५-२७ चक्रात भारताचे सात कसोटी सामने बाकी असून, यापैकी सहा सामने जिंकणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे.






