फोटो सौजन्य – X (ICC)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कसोटी मालिका पार पडली या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला एकही सामना जिंकू दिले नाही. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १७६ धावांनी पराभव केला आणि यजमान संघाला ३-० असा व्हाईटवॉश दिला. तिसऱ्या पिंक बॉल कसोटीच्या शेवटच्या डावात कांगारूंनी वेस्ट इंडिजला फक्त २७ धावांत गुंडाळले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे; १९५५ मध्ये इंग्लंडविरुद्ध, किवी संघ फक्त २६ धावांवर ऑलआउट झाला. सॅम कॉन्स्टासच्या शेवटच्या क्षणी चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे वेस्ट इंडिजला एक धाव मिळाली, अन्यथा यजमान संघाने ७० वर्षांच्या सर्वात कमी धावसंख्येची बरोबरी केली असती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ फक्त २२५ धावांवर कोसळला.
An Australian clean sweep in the Caribbean 🧹
More 📲 https://t.co/Gvv36lMTKo#WTC27 #WIvAUS pic.twitter.com/VdFfDKSptJ
— ICC (@ICC) July 14, 2025
कोणताही फलंदाज ५० धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४८ धावा केल्या, तर कॅमेरॉन ग्रीनने ४६ धावा करून त्याला साथ दिली. वेस्ट इंडिजकडून शमार जोसेफने सर्वाधिक ४ बळी घेतले. पिंक बॉल टेस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची अवस्था ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट दिसली. पहिल्या डावात संपूर्ण संघ १४३ धावांवर ऑलआउट झाला. अर्धशतक तर सोडाच, एकाही फलंदाजाला ४० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. कांगारूंकडून बोलँडने ३ बळी घेतले तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाकडे ८२ धावांची आघाडी होती.
दुसऱ्या डावात, कॅमेरॉन ग्रीनच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने फक्त १२१ धावा केल्या आणि यजमानांना विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्याच षटकात मिशेल स्टार्कने तीन झटके दिले. स्टार्कचा कहर इथेच थांबला नाही, पाचव्या षटकात आणखी दोन विकेट घेत त्याने वेस्ट इंडिज संघाचा अर्धा भाग फक्त ७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
ऑस्ट्रेलियाच्या धोकादायक गोलंदाजी आक्रमणासमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज फक्त १४.३ षटकेच टिकू शकले. स्टार्कने ७.३ षटकांत ९ धावा देत सर्वाधिक ६ बळी घेतले, तर बोलँडने ३ आणि हेझलवूडने एक बळी घेतला. पॅट कमिन्स अजून गोलंदाजी करायला आले नव्हते.