फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
आयसीसीची पाकिस्तानी खेळाडूंवर कारवाई : पाकिस्तानमध्ये नुकतीच त्रिकोणी मालिका झाली, यामध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळत होते. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे. तिरंगी मालिकेत १२ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला संहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, कामरान गुलाम आणि सौद शकील यांना संहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहे. दोघांकडूनही मॅच फीच्या १० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर आयसीसीने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “#PAKvSA मध्ये ICC आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर माहिती आयसीसीने वेबसाईटवर दिली आहे.
Three Pakistan players receive fines for breaching ICC Code of Conduct in #PAKvSA.https://t.co/oINQsN7Qvd
— ICC (@ICC) February 13, 2025
वेबसाईवर माहिती शेअर केली आहे, यामध्ये लिहिले आहे की, ही घटना पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान घडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २८ व्या षटकात ही घटना घडली आहे असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे की, जेव्हा शाहीनने जाणूनबुजून फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झकेला एक धाव घेताना अडवले, ज्यामुळे शारीरिक संपर्क झाला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला असे या सामन्यांमध्ये एकदाच नाही तर दोन वेळा झाले आहे.
आयसीसीने सांगितले की, दुसऱ्या एका घटनेत २९ व्या षटकात टेम्बा बावुमा धावबाद झाल्यानंतर त्याला खूप जवळून खेळवल्याबद्दल सौद शकील आणि बदली क्षेत्ररक्षक कामरान गुलाम यांना त्यांच्या सामन्याच्या फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेला हरवून पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. १४ फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होईल. १२ फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३५२ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या नाबाद १२२ धावांच्या आणि सलमान आघाच्या १३४ धावांच्या जोरावर ४९ षटकांत ६ गडी राखून सामना जिंकला.