brijbhushan singh : बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान; महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली, सौजन्य : आयएएनएस
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh ) आणि सहआरोपी विनोद तोमर यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी आव्हान दिले आहे. या फौजदारी अपिलावर शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता २८ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू सत्र न्यायालयात ही अपील याचिका दाखल केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने बृजभूषण यांना या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. सुनावणीसाठी बृजभूषण शरण सिंह स्वतः न्यायालयात उपस्थित होते. यापूर्वी न्यायालयाने बृजभूषण आणि विनोद तोमर यांना नोटीस बजावून उत्तर मागितले होते.
दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी बृजभूषण शरण सिंह यांना या प्रकरणात निर्दोष ठरवले होते. चार महिला कुस्तीपटूंनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. विनोद तोमर यांना निर्दोष ठरवण्याच्या आदेशालाही आव्हान देण्यात आले आहे.
मजिस्ट्रेट न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. पुराव्यांचे चुकीच्या पद्धतीने आणि निवडक स्वरूपात मूल्यमापन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा निर्णय अनुमान आणि तर्कांवर आधारित असून, प्रस्थापित कायदेशीर तत्त्वांचा योग्य वापर करण्यात आलेला नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना
तसेच, पीडितेच्या वर्तनाबाबतच्या जुन्या रूढीवादी दृष्टिकोनाचा आधार निर्णयात घेतल्याचा आक्षेप महिला कुस्तीपटूंनी नोंदवला आहे.
या प्रकरणाला २०२३ मध्ये सुरुवात झाली होती. अनेक नामांकित महिला कुस्तीपटूंनी २०१६ ते २०२२ या कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे, भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि अन्य ठिकाणी बृजभूषण शरण सिंह यांनी अनुचित वर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्यावरील आरोप सातत्याने फेटाळले आहेत.






