Jeet Raval announced Retirement
३८ वर्षीय जीत रावलने २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी निवृत्तीची घोषणा केली. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनला आपल्या निवृत्तीबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, ‘हा निर्णय घेताना त्याला खूप अभिमान वाटत आहे. मी माझ्या निर्णयावर पूर्णपणे आनंदी आणि समाधानी आहे. लहानपणापासूनच न्यूझीलंडसाठी खेळण्याचे हे माझे स्वप्न होते आणि मी त्या दिवसांकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. हे केवळ माझेच नाही, तर वडिलांचेही स्वप्न होते. माझ्या वडिलांना न्यूझीलंडमध्ये एका चांगल्या भविष्याची आशा दिसली आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबाला स्थलांतरित केले, जेणेकरून मी क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.’
जीत रावलचा जन्म सप्टेंबर १९८८ मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला. त्याने विद्यानगर शाळेत शिक्षण घेतले, जिथे लहानपणी तो भारतीय विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेलसोबत डावाची सुरुवात करायचा. त्याने गुजरातच्या १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील संघांकडूनही क्रिकेट खेळले. २००४ मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी, ते आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे स्थलांतरित झाला.
जीत हा न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीच्या फलंदाजांपैकी एक होता. त्याने आपल्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीत १६४ सामने खेळताना ३७.६६ च्या सरासरीने १०,४३२ धावा केल्या. यामध्ये २४ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या प्रमुख देशांतर्गत स्पर्धांपैकी असलेल्या प्लंकेट शील्डमध्ये त्याने ८,६६२ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जीत रावलने न्यूझीलंडकडून २४ कसोटी सामने खेळले. ३९ डावांत त्याने १,१४३ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळला. तब्बल १८ वर्षांच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीनंतर त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.






