Chess World Cup: Maharashtra's girl becomes queen of 64 houses! Divya Deshmukh becomes chess world champion by defeating Koneru Humpy
Divya Deshmukh becomes Women’s Chess World Champion: महाराष्ट्राची १९ वर्षीय लेक दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. या लढतीत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत ६४ घरांची राणी बनण्याचा मान पटकावला आहे. दोन्ही खेळाडूंमधील क्लासिकल सामने अनिर्णित राहिले आहेत. शनिवार आणि रविवारी झालेल्या क्लासिकल सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू देण्यापासून रोखले. क्लासिकल सामन्याचा १-१ असा बरोबरीत शेवट झाला.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, इंग्लडच्या संघामध्ये होणार या गोलंदाजाची एन्ट्री!
सोमवारी खेळवण्यात आलेल्या रॅपिड राउंडमध्ये १८ व्या जागतिक क्रमवारीत नागपूच्या दिव्या देशमुखने पांढऱ्या तुकड्यांसह सुरुवात केली. दिव्या खूप आक्रमक दिसून आली. परंतु ५ व्या जागतिक क्रमवारीत असलेल्या हम्पीने काळ्या तुकड्यांसह खेळत सामना बरोबरीत आणण्यात यश मिळवले आणि मानसिक फायदा घेतला. रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या तुकड्यांसह खेळत दिव्या देशमुखने सुरुवातीपासूनच आपला दबदबा राखला. तर, तज्ञांच्या मते, सुरुवातीला कोनेरूसाठी वेळेचे व्यवस्थापन थोडे कठीण दिसून आले आणि तिने रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये देखील चूक केली.
यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे भारताच्या दोन्ही खेळाडूंनी चिनी भिंत तोडून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. फिडे विश्वचषक नॉकआउट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, ३८ वर्षीय कोनेरू हम्पी आणि १९ वर्षीय दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत अनेक चिनी खेळाडूंवर मात केली. महिला गटात चीन टॉप १०० मध्ये अव्वल स्थानावर आहे. चीनच्या १४ खेळाडूंनंतर, भारतातील ९ खेळाडू टॉप १०० मध्ये येतात. परंतु फिडे विश्वचषकामध्ये कोनेरू आणि दिव्या यांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चिनी खेळाडूंना पराभूत करत भारताचा दबदबा दाखवून दिला.
FIDE महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीत विजेती ठरणाऱ्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३५००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे म्हणून मिळणार आहेत.