Dark shadow over IPL 2025, one person is getting close to the players, anti-corruption team is active
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३१ सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकते स्पर्धा बघायला मिळत असून प्रत्येक संघ आपली कामगिरी ससुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच बीसीसीआयकडून सर्व फ्रँचायझी, खेळाडू, प्रशिक्षक आणि संघातील सहयोगींना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्वांना हैदराबादमधील एका व्यावसायिकापासून लांब राहण्यास सांगितले आहे. बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की, लीगमध्ये सहभागी असलेल्या सर्व फ्रँचायझींना भ्रष्ट कारवायांमध्ये अडकवण्याचे प्रयत्न सुरू असून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे.
बीसीसीआयने फ्रँचायझी, खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन तसेच समालोचकांना इशारा दिला आहे. बीसीसीआयने सांगितले की, संशयास्पद ओळखपत्र असलेला एक व्यापारी लीगमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही सर्वांनी सुरक्षित राहून काळजी घ्यावी. जर त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध असेल तर ताबडतोब माहिती द्या.
या बातमीनंतर भ्रष्टाचार विरोधी सुरक्षा युनिट सक्रिय झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक सुरक्षा युनिटकडून असा दावा करण्यात आला आहे की, बुकींशी थेट संबंध असलेली एक व्यक्ती हैदराबादमधील एक व्यापारी आहे. तसेच, तो लीगमधील लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीचा भ्रष्ट कारवायांचा एक मोठा इतिहास आहे.
भ्रष्टाचार विरोधी सुरक्षा युनिटकडून आयपीएलशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना त्या व्यावसायिकाशी कोणत्याही प्रकारचा संवाद टाळण्याचे आवाहन केले आहे. जर असा संवाद झाला तर त्यांनी त्याबाबत थेट तक्रार करावी. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, असे मानले जाते की एसीएसयूकडून लीगमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे सांगण्यात येत आहे की, तो व्यक्ती मुलीला दागिन्यांसह महागड्या भेटवस्तू देऊन जाळ्यात ओढतो.
हेही वाचा : PBKS vs KKR : युजवेंद्र चहलने केली विशेष कामगिरी, असा करणारा आयपीएलच्या इतिहासात ठरला पहिलाच गोलंदाज..
अहवालानुसार, हा व्यापारी चाहता बनून खेळाडूंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. तो सामन्यांदरम्यान आणि टीम हॉटेल्समध्ये देखील दिसला आहे. तो खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी मैत्री करण्यासाठी निमित्त शोधत असल्याची माहिती मिळत आहे. तो केवळ संघातील सदस्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना देखील भेटवस्तू देत असल्याचे समोर आले आहे.