
Delhi blast: Hashim Amla's 'that' claim turned out to be false! The post that India is unsafe went viral
Hashim Amala Viral Post, FACT CHECK : दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू हाशिम अमलाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अमलाने भारत असुरक्षित असल्याचे म्हटले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतातून परतण्याचा सल्ला देखील दिला होता. परंतु, आता ही पोस्ट खोटी असल्याची समोर आले आहे.
अमलाशी संबंधित असणाऱ्या त्या पोस्टमध्ये असे देखील म्हटले होते की, ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना भारतात त्रास दिला जात आहे आणि आयसीसीने भारतात क्रिकेटवर बंदी घालण्यात यावी. ही पोस्ट एका पाकिस्तानी वापरकर्त्याकडून शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट २,५०,००० हून अधिक लोकांनी पाहिली असून अनेक वापरकर्त्यांनी ती लाईक आणि शेअर देखील केली आहे.
या दाव्याची चौकशी केली असता असे दिसून आले की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर हाशिम अमलाशी संबंधित कोणतेही विधान किंवा बातमी नाही ज्यामध्ये त्याने भारताला असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्याने कोणत्याही खेळाडूला भारतातून परतण्याचा सल्ला देखील दिलेला नाही. हाशिम अमलाच्या सोशल मीडिया अकाउंटवरही अशा कोणत्याही पोस्ट असल्याचे दिसले नाही.
मुंबईतील ‘SA20 इंडिया डे २०२५’ कार्यक्रमात मार्क बाउचर, ग्रॅम स्मिथ, डेव्हिड मिलर, फाफ डू प्लेसिस आणि टॉम मूडी यांच्यासह अनेक इतर क्रिकेटपटूंसह हाशिम अमला देखील दिसून आला. त्याने नेहमीच भारतीय क्रिकेटबद्दल आदर आणि सकारात्मकता व्यक्त केली आहे.
हाशिम अमलाने अलीकडेच भारतीय कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले आहे. कौतुक करताना त्याने म्हटले की, “गिल ज्या पद्धतीने कर्णधार आणि सलामीवीर दोन्ही भूमिका सांभाळत आहे, त्यावरून त्याचे मजबूत व्यक्तिमत्व आणि हुशार क्रिकेट मन दिसून येते.” गिल भारतीय संघाला नवीन उंचीवर नेऊ शकतो असा अमलाचा विश्वास आहे. त्याचे शब्द भारतातील क्रिकेटबद्दलचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अफवांवर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम अमलाबद्दल केले जात असलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत.