IND vs SA : दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त(फोटो-बीसीसीआय)
IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर सुरू आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात देखील दाणादाण उडाली आहे. रवींद्र जाडेजाच्या जादुई फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ७ बाद ९३ धावा केल्या आहेत. कॉर्बिन बॉश आणि टेम्बा बावुमा क्रीजवर नाबाद राहिले आहेत. टेम्बा बावुमा २९ धावांवर नाबाद आहे, तर बॉश १ धावांवर नाबाद आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ बळी घेतले आहेत.
हेही वाचा : महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची नांदी! Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा
नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त ५५ षटकांमध्ये १५९ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करामने सर्वाधिक ३१ धावा केल्या होत्या. भारताकडून जसप्रीत बूमराने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. प्रतिऊउत्तरात १५९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ १८९ धावा उभ्या करू शकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३० धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३९ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने ४ आणि मार्को जॅनसेनने ३ बळी घेतले.
भारताने ३० धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवशी मैदानात फलंदाजीसाठी उतरली. दुसऱ्या डावा त देखील दक्षिण आफ्रिका संघ काही खास करू शकला नाही. भारताच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हतबल दिसून आले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीपुढे नांगी टाकली. एडेन मार्कराम ४, रायन रिकेल्टन ११, टोनी डी झोर्झी २, ट्रिस्टन स्टब्स ५, काइल व्हेरेन ९, मार्को जानसेन १३ धावा करून बाद झाले. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार टेम्बा बावुमा २९ धावांवर नाबाद आहे, तर बॉश १ धावांवर नाबाद आहे.
हेही वाचा : Smriti Mandhana पहिल्यांदाच दिसली एंगेजमेंट रिंग घालून; पलाश मुच्छलने या क्रिकेट स्टेडियममध्ये केला प्रपोज
भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेतली. आता दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली असून त्यांचे आता ३ गडी शिल्लक आहे. तिसऱ्या दिवशी भारत दक्षिण आफ्रिका संघाला कमीत कमी धाव धावसंख्येवर रोखून तिसऱ्याच दिवशी विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.






