द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन (फोटो सौजन्य - Instagram)
क्रिकेटचे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक असणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून दीर्घकाळ आजारी असणाऱ्या द्वारकानाथ यांची प्राणज्योत आज मालवली असून क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईच्या लीलावती रूग्णालयामध्ये द्वारकानाथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उत्तम लेखक आणि समीक्षक असणाऱ्या द्वारकानाथ यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि समीक्षक विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.
क्रिकेटमधील रूची आणि मराठी साहित्याची जाण यांचे उत्कृष्ट समीकरण असणारा हा अवलिया वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजारामुळे आपल्यातून निघून गेला असला तरीही त्यांचे साहित्य हे कायम लोकांच्या मनात रूंजी घालत राहणार आहे याबाबत नक्कीच कोणालाही शंका नाही. साहित्य विश्वातही द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे आणि आता क्रिकेटमधील उत्तम समीक्षा नक्की कशी लिहिली जाणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.
उद्या 12 वाजता अत्यंसंस्कार
सध्या मिळालेल्या बातमीनुसार उद्या अर्थात 7 फेब्रुवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचे पार्थिव हे अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अनेक राजकीय नेत्यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर वेगाने ही दुःखद बातमी पसरली असून सर्वच स्तरावर सध्या हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
हर्षा भोगले यांनी केले ट्विट
Extremely saddened to hear of the passing of Dwarkanath Sanzgiri. A friend of 38 years, so many shared memories and someone who wrote with so much beauty and style and colour. You visualised things when he wrote about them. What a fight against the forces that threatened to take…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 6, 2025
मराठमोळा समीक्षक आणि कॉमेंट्रिटर हर्षा भोगले यांनी भावूक होत ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूपच दुःख झाले आहे. गेल्या ३८ वर्षांपासूनचा मित्र, इतक्या आठवणी आणि अशी व्यक्ती जी लेखही इतक्या सौंदर्याने, शैलीने आणि रंगवून लिहित असे. त्यांचे लिखाण वाचताना तुम्ही ते डोळ्यासमोर अनुभवता हे मात्र नक्की. त्याने नेहमीच आजारांविरुद्धही लढा दिला! त्याने कायम आपली लेखनसमृद्धी वाचकांसमोर ठेवली असं म्हणत X वर श्रद्धांजली वाहिली
प्रताप सरनाईक यांनी केले दुःख व्यक्त
साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख अगदी लहान मुलांपासून ते प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक असणाऱ्या संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला आहे स्वर्गीय द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये ट्विट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांचे शिक्षण
द्वारकानाथ संझगिरी यांचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि मुंबई महापालिकेमध्ये ते उच्च पदावर कार्यरत होते. द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईमधील दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीमध्ये झाला होता आणि त्यांचे शिक्षण किंग जॉर्ज स्कूल जे आता राजा शिवाजी विद्यालय नावाने ओळखले जाते तिथे त्यांनी पूर्ण केले. तर रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध व्हीजेटीआय अर्थात वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, पूर्वीची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.