Gurugram : ही गोष्ट एका आजीबाईंची आहे. नातीचे स्वप्न पूर्ण करता करता आजीबाईना वयाच्या साठीत स्वत:साठी नवं ध्येय (New Goal) सापडलं. 30 एप्रिल रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये (International karate championship) 60 वर्षीय गीता गोदारा उझबेकिस्तानच्या खेळाडूला लाथ मारत होती तेव्हा तिची 13 वर्षांची नात आश्का गोदारा टाळ्या वाजवत होती. या स्पर्धेत गीता यांनी रौप्यपदक पटकावले. आशकानेही याच स्पर्धेत 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले. अशा या आजी-नातीची चर्चा सगळीकडे रंगत आहे. दोन वर्षांपूर्वी गीता गोदारा (Geeta godara) यांनी आपल्या नातील कराटे शिकता यावे म्हणून तिच्या वयाच्या 11 व्या वर्षी कराटे ॲकडमीत नेले. त्यावेळी असं काही होईल याची आजीबाईंनाही कल्पना नव्हती. सेक्टर 5 मध्ये राहणाऱ्या गीता यांनी सांगितले की हे पदक जिंकल्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे.
आजीबाईंचा प्रेरणादायी प्रवास
नातीला सराव करताना पाहून आजीलाही उत्सुकता निर्माण झाली आणि आजीबाईंनी नातीच्या कोचना म्हणजेच सुनील सैनी यांना विचारले की त्यांनाही खेळता येईल का? कोचने अनेक दिवस त्यांच्या फिटनेसचे निरीक्षण केले. आणि मग त्यांना कराटेच्या युक्त्या शिकवल्या. हळूहळू आजीबाई त्यात रमल्या. त्यांनी इतकी चांगली कामगिरी केली की दीड वर्षांतच त्यांनी देशासाठी पदके मिळवली. त्यांची नात आश्का हिने सांगितले की ती सुद्धा तिच्या आजीसोबत घरी सराव करते.
ॲकडमीमध्ये दररोज २ तास सराव केल्यानंतर तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती आजीसोबत सरावासाठी वेळ देते. अशा स्थितीत त्यांना जोडीदारही मिळतो आणि दोघीमध्ये चांगले बॉन्डिंग होते. गीता यांना स्वत:साठी कधीच वेळ मिळाला नव्हता. मात्र, नातीच्या निमित्ताने त्यांना आता स्वत:साठी वेळ मिळत आहे.
आजीबाईंच्या शहरातील 4 खेळाडूंना पदके मिळाली
दुबई येथे झालेल्या या चॅम्पियनशिपमध्ये गुरगावच्या एकूण 4 खेळाडूंनी पदके मिळवली. भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि रेफरी सुनील सैनी आणि संघाचे प्रशिक्षक विक्रम तिहाल यांनी सांगितले की या स्पर्धेत 22 देश सहभागी झाले होते. भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, इराण, जपान, इंडोनेशिया, रशिया, मलेशिया, श्रीलंका यासह अनेक देशांतील 2500 हून अधिक खेळाडूंनी येथे सहभाग घेतला.
भारतातील सुमारे 30 खेळाडूंनी भाग घेतला, त्यापैकी 4 गुरगाव शहरातील खेळाडूंनी 1 सुवर्ण आणि इतर पदके मिळवली. ज्यामध्ये 6 वर्षीय दुर्जॉय सिंगने 22 किलो वजनी गटात सुवर्ण आणि रौप्यपदक, 13 वर्षीय आश्का गोदाराने 47 किलो वजनी गटात रौप्य आणि कांस्यपदक, 11 वर्षीय आत्मा जैन याने 40 किलो वजनी गटात 2 कांस्यपदक आणि 59 वर्षांच्या वयोगटात कांस्यपदक पटकावले. 83 किलोमध्ये गीता गोदाराने रौप्य पदक जिंकले.






