अंडर-१९ आशिया कप : नुकताच वर्ल्ड कपचा क्रेझ संपला आहे आणि आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील लढत पाहायला संपूर्ण जग उत्सुक असत. आता क्रिकेट सामन्याची माहिती ऐकून क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकला होता. पण १० डिसेंबरला म्हणजेच ३ दिवसांनंतर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानात आमनेसामने येतील असे म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते पूर्णपणे खरे आहे.
८ डिसेंबर पासून पुरुष अंडर -१९ सुरु होणार आहे. यामध्ये १० डिसेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. उदय सहारन या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईतील आयसीसी अकादमी ओव्हल-१ येथे होणार आहे. ८ संघांच्या अंडर-१९ आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, UAE आणि जपान या संघांचा समावेश आहे. या संघांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. तर ब गटात बांग्लादेश, श्रीलंका, यूएई आणि जपान या संघांना स्थान देण्यात आले आहे.
८ संघांच्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध ८ डिसेंबर रोजी होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर पाकिस्तान संघ आपला पहिला सामना ८ डिसेंबरला नेपाळविरुद्ध खेळणार आहे.
अंडर-१९ आशिया कपसाठी भारतीय संघ
उदय सहारन (कर्णधार), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, धनुष गौडा, अविनाश राव (यष्टीरक्षक), एम अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.