मुंबई : सेरेना विल्यम्स( Serena Williams) , मारिया शारापोवा (Maria Sharapova), आंद्रे अगासी (Andre Agassi) अशा टेनिस विश्वातील महान खेळाडूंना घडवणारे प्रशिक्षक निक बोलेटिएरी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने टेनिस जगतात शोककळा पसरली आहे. सोमवारी निक बोलेटिएरी यांच्या आयएमजी अकादमीने सोमवारी निक यांच्या निधनाबाबत निवेदन जरी केले.
निक बोलेटिएरी यांनी १९७८ मध्ये ‘निक बोलेटिएरी टेनिस अकादमी’ची स्थापना केली. सध्या ही अकादमी आयएमजी (IMG Academy) म्हणून ओळखली जाते. या अकादमीतून अव्वल दर्जाचे बरेच टेनिसपटू जगासमोर आले. प्रतिभावान खेळाडूंमध्ये सुरू असलेली स्पर्धा यावर लक्ष केंद्रित करुन या अकादमीने अनेक रत्न टेनिस जगताला दिले. यामध्ये सेरेना विल्यम्स, तिची बहिण विनस विल्यम्स तसंच मारिया शारापोवा, आंद्रे अगासी अशा बऱ्याच स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. बऱ्याच स्टार टेनिस खेळाडूंनी निक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. जर्मन टेनिसपटू टॉमी हास याने त्याच्या बालपणीचा फोटो ज्यामध्ये निक आहेत, तो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.