LSG vs PBKS: 'He has the qualities of MS Dhoni, he is the same..', Matthew Hayden's search for the new Dhoni in IPL..
LSG vs PBKS : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात ५४ सामने खेळवण्यात आले आहेत. काल झालेल्या ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या जोरावर लखनौसमोर २३६ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रभसिमरन सिंगने आपल्या ९१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार लागवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरने देखील २५ चेंडूत ४५ धावांची महत्वाची खेळी केली. प्रत्युउत्तरात एलएसजीचा संघ केवळ १९९ धावापर्यंतच मजल मारू शकला. एलएसजीकडून आयुष बडोनी (४० चेंडू ७४धावा) आणि अब्दुल समद (२४ चेंडूत ४५धावा) यांची झुंज अपयशी ठरली आणि परिणामी पंजाबने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३७ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात प्रभसिमरनने चमकदार कामगिरी केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ९१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. प्रभसिमरनची फलंदाजीने लखनौच्या गोलंदाजांना जेरीस आणले. प्रभसिमरन सिंगला त्याच्या धमाकेदार खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रभसिमरनची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन देखील प्रभावित झाला. त्याने त्याच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभसिमरनबद्दल हेडनने आपले मत व्यक्त केले. हेडनकडून प्रभसिमरनच्या फलंदाजीची तुलना धोनीच्या फलंदाजीशी करण्यात आली आहे. स्टार स्पोर्ट्सवर प्रभसिमरनबद्दल बोलताना मॅथ्यू हेडन म्हणाला की, ‘त्याच्याकडे खूप ताकद आहे. २०१० मध्ये, एक तरुण एमएस धोनी होता जो शेवटच्या षटकामध्ये चेंडूला सीमापार टोलवण्यात माहिर होता. प्रभसिमरनमध्ये देखील असेच गुण आहेत. त्याच्याकडे फलंदाजीचा चांगला वेग आहे, त्याचा पाया हा मजबूत आहे. तो इतका उंच नाही, म्हणून तो खरोखरच चेंडू अंतरावर मारू शकतो, तसेच तो निर्भय आहे.’ हेडन पुढे म्हणाला की, ‘एलएसजीविरुद्ध त्याने चेंडूंचा सामना कसा केला ते तुम्ही बघू शकता. त्याचे त्याच्या फलंदाजीवर पूर्ण नियंत्रण दिसून येत होते. त्याने गोलंदाजांना भरपूर चुका करण्यास भाग पाडले.
इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी युवराज सिंगने देखील प्रभसिमरनबद्दल एक भाकीत केले होते आणि त्याला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार म्हटले होते. प्रभसिमरन शतक पूर्ण करू शकला नाही. त्याच्या फलंदाजीने पंजाब किंग्जच्या वाट्याला एक शानदार विजय मिळवून दिला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरनच्या खेळीच्या जोरावर पंजाबने २३६ धावापर्यंत मजल मारली. नंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने ७ विकेट्स गमावून फक्त १९९ धावाच करता आल्या.