Mohammed Shami
भुवनेश्वर कुमारच्या टी२० संघात पुनरागमनानंतर, मोहम्मद शमीच्या कमबॅकबद्दलही जोरदार चर्चा सुरू होती. वृत्तानुसार, न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या एकदिवसीय किंवा कसोटी संघात शामीला सामील केले जाईल, अशी माहिती होती. मात्र, शामीला दोन्हीही संघांमधून वगळण्यात आले आहे.
मोहम्मद शमीने २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी आपला पहिला सामना खेळला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १ विकेट घेतला. मात्र, पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करुनही बंगाल आणि सर्व्हिसेस यांच्यातील रणजी ट्रॉफी एलिट सामन्यात मोहम्मद शामीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नाही. शामीने स्वतःहून या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला की संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली. याबद्दलती अधिकृत माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाही.
मोहम्मद शमीने आतापर्यंत १०१ प्रथम-श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने ३८९ विकेट्स घेतले आहेत. या कालावधीत शमीने १५ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स आणि दोन वेळा १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतले आहेत.
सर्व्हिसेसविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून केवळ मोहम्मद शमीलाच वगळण्यात आले नाही, तर मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही वगळण्यात आले आहे. हे दोघेही न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेसाठीच्या भारत ‘अ’ संघाचा भाग आहेत. त्यामुळे हे दोघेही रणजी सामन्यात खेळताना दिसणार नाही. भारत अ संघ येत्या काही दिवसांत न्यूझीलंडला रवाना होईल.
सर्व्हिसेस विरुद्ध बंगालचा प्लेइंग ११: अभिमन्यू ईश्वरन (क), अंकुर पॉल, सुदीप कुमार घारामी, सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, सुमंत गुप्ता, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रदीप्ता प्रामानिक, आमिर घनी, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल.






