

जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक विजयी
44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेला रंगत
किशोर गटाच्या मुंबई उपनगर संघाचे नेतृत्व साहिल यादवकडे
Kabaddi Tournament : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत निवारा हिड इंडिया संघाने महिलांच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम श्रेणी पुरुष गटात जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक या संघांनी दुसऱ्या फेरीत धडक दिली. ही स्पर्धा विक्रोळी (पश्चिम) येथील पार्कसाइट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स रोडवरील महापालिका मैदानावर सुरू आहे.
महिला गटात निवारा हिड इंडिया संघाने सिद्धार्थ क्रीडा संघाचा 38-11 असा एकतर्फी पराभव केला. मध्यंतराला 24-8 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या निवारा हिड इंडियाने उत्तरार्धातही आक्रमक खेळ कायम ठेवला. तनुजा लाड आणि इशिका थोपकर यांनी दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सिद्धार्थच्या वैष्णवी गुरवचा प्रतिकार अपुरा ठरला.
प्रथम श्रेणी पुरुष गटात जय भवानीने स्वयंभू मंडळावर 34-20 अशी मात केली. मध्यंतराला दोन्ही संघ 12-12 अशा बरोबरीत होते. मात्र, उत्तरार्धात केतन शिंदे आणि आकाश पवार यांनी आक्रमक खेळ करत जय भवानीला विजय मिळवून दिला.
अमरज्योत मंडळाने संकेत मोरे आणि दीपक मांढरे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संभाजी मंडळाचा 35-22 असा पराभव केला. शिवनेरी क्रीडाने ऋषभ सिंग आणि प्रथमेश जावळे यांच्या चढाई-पकडीतील प्रभावी कामगिरीच्या बळावर सक्षम स्पोर्ट्सला 29-15 असे नमविले. श्री सिद्धिविनायकने साई स्पोर्ट्सवर 26-19 असा विजय मिळवला. ओम कवळे आणि ओमकार मोरे यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. साई स्पोर्ट्सकडून प्रतीक वाडकरने चांगला खेळ केला.
दरम्यान, चिपळूण, रत्नागिरी येथे 1 डिसेंबरपासून होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर असोसिएशनने किशोर गटाचा संघ जाहीर केला आहे. साहिल यादवकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघात स्मित गुदडे, रुद्र क्षीरसागर, नमन राठोड, जयेश शितकर, उमेर खान, मयंक केणे, सोहम घरत, स्मित पयेर, भावेश शितकर, भावेश बोऱ्हाडे, हर्षद कस्तुरे, अतिष साळुंखे आणि विग्नेश भगत यांचा समावेश आहे. हेमंत तोडणकर यांची प्रशिक्षक, तर शैलेश गावडे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.