Olympic athlete Khashaba Jadhav concludes traditional indigenous sports mega event with enthusiasm, 27 thousand competitors participate
मुंबई : परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले. कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचा आज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा : Hockey Asia Cup 2025 : भारतीय महिला हॉकी संघ जाहीर! सलीमा टेटे करणार संघाचे नेतृत्व
शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मनोज रेड्डी यावेळी उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमाने तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान अल्पावधीत उभारल्याबाबतही त्यांचे आभार मानतो. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातात, मात्र लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनर्जीवित केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा : BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
परंपरागत कबड्डी, खो-खो, कुस्ती, पंजा लढवणे, तलवारबाजी, पावनखिंड दौड (मॅरेथॉन) रस्सीखेच, विटी-दांडू, मल्लखांब, फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी मैदान गाजवले. तर ४५० खेळाडूंना विधान परिषदेचे सभापती श्री. राम शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी लेझीमसह लाठीकाठी, तलवारबाजी या साहसी खेळांची प्रात्यक्षिकं ही सादर करण्यात आली.