बीसीसीआय(फोटो-सोशल मीडिया)
Recruitment for posts in BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अनेक पदांसाठी रिक्त जागांसाठी पदभरती काढली आहे. यामध्ये राष्ट्रीय निवडकर्त्या पदासाठी अर्ज मागविले गेले आहेत. याशिवाय महिला आणि कनिष्ठ निवड समितीमधील पदांसाठी देखील अर्जाची मागणी करण्यात आली आहे. या पदासाठी अनेक पात्रता देखील ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविला आहे. एका वृत्तानुसार, त्यांचा करार जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला असून आता बीसीसीआयकडून निवड समितीच्या सदस्यांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरी मिळाल्यानंतर, बोर्ड या सदस्यांना सुमारे ९० लाख रुपये वार्षिक पगार देणार आहे.
हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेतील ‘या’ 8 शहरांमध्ये रंगणार 44 सामन्यांचा थरार! World Cup 2027 बद्दल मोठी माहिती समोर..
बीसीसीआयकडून २२ ऑगस्ट, शुक्रवारी रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ पुरुष संघासाठी दोन राष्ट्रीय निवडकर्त्यांसाठी, महिला संघासाठी चार निवडकर्त्यांसाठी तसेच कनिष्ठ संघासाठी एका निवडकर्त्या जागेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्रता देखील निश्चित करण्यात आली असून ज्या खेळाडूंनी टीम इंडियासाठी ७ कसोटी सामने किंवा ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत, त्यांनाच वरिष्ठ पुरुष संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. या पात्रता निकषांची पूर्तता करत असणारा कोणीही अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
याशिवाय महिला निवड समितीमध्ये ४ महिला सदस्यांसाठी अर्ज मागविले गेले आहे. पाच वर्षांपूर्वी टीम इंडियामधून निवृत्त झालेल्या महिला खेळाडूच यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. याशिवाय, ती गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही क्रिकेट समितीची सदस्य असू नये. निवड झाल्यानंतर त्यांना लाखो रुपये वेतन मिळणार आहे. वरिष्ठ संघाच्या निवड समितीच्या सदस्याला सुमारे ९० लाख रुपये वार्षिक वेतन देण्यात येणार आहे. तर ज्युनियर क्रिकेट समितीच्या सदस्याला ३० लाख रुपये वार्षिक वेतनमिळणार आहे.
ज्युनियर क्रिकेट समितीमध्ये एक जागा रिक्त आहे. ज्युनियर क्रिकेट समितीमधील एका सदस्यासाठी अर्ज मंगविले गेले आहेत. किमान २५ प्रथम श्रेणी सामने खेळलेले खेळाडूच यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. याशिवाय यामध्ये एक यात आहे ती म्हणजे तो पाच वर्षांपूर्वी निवृत्त झालेला असावा. तसेच, तो गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही क्रिकेट समितीचा सदस्य असू नये अशी अट आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंग प्रक्रियेनंतर, उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.