Champion Trophy 2025: Neither Rohit nor Virat, Wasim Akram announces the name of 'this' best player in the Champions Trophy...
Champion Trophy 2025 : भारतीय संघाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला, तर रचिन रवींद्रला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला आहे. अशातच स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने त्याला प्रभावित करणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सपूर्ण स्पर्धेत अक्रमला रचिन रवींद्र हा सर्वोत्तम खेळाडू वाटला आहे.
रचिन रवींद्रबद्दल बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, ‘न्यूझीलंड क्रिकेटने अप्रतिम खेळ खेळला आहे. लहान देश असून देखील त्यांचा संघ हा कोणत्याही स्पर्धेत चांगलीच कामगिरी करत आला आहे. मग ती क्रिकेट असो किंवा रग्बी. न्यूझीलंड संघात आता एक असा खेळाडू आहे, जो भविष्याचा सुपरस्टार असणार आहे. रचिनने अंतिम सामन्यात दाखवलेल्या लढाऊ बाणा मला खूप प्रभावित करून गेला आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहून खूप चांगले वाटले.’
अक्रम पुढे म्हणाला, ‘जर रचिनने अंतिम फेरीत आणखी 10 षटके खेळून काढली असती तर कदाचित भारताला अंतिम सामना जिंकण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला असता.’ तसेच अक्रमकडून रचिन रवींद्रची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडसोबत करण्यात आली आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.
न्यूझीलंडचा कर्णधार सॅन्टनर पुढे म्हणाला की, अंतिम फेरीत आमचा सामना एका चांगल्या संघाशी झाला होता. संपूर्ण खेळात आम्हाला मोठे आव्हान देण्यात आले, जे छान होते आणि मला वाटते की कदाचित असे काही क्षण आहेत, जिथे आम्ही ते आमच्यापासून दूर जाऊ दिले. पण हो, या संपूर्ण स्पर्धेत आम्ही या संघासोबत ज्या पद्धतीने खेळलो त्याचा मला खूप अभिमान आहे. सॅन्टनर म्हणाला की, त्यांचा संघ दुबईतील खेळपट्टी आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होता. जी की लाहोरपेक्षा खूपच वेगळे होती. जेथे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
सॅन्टनर म्हणाला की, आम्ही भारताविरुद्ध सतत खेळत आहोत जे आमच्यासाठी नेहमीच एक आव्हान असते. उपांत्य फेरीपेक्षा अंतिम सामन्यात परिस्थिती थोडी वेगळी असेल, हे आम्हाला माहीत होते. पण, आम्ही त्यासाठी सज्ज होतो. तरीही आम्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आणि भारताला शेवटपर्यंत लढा दिला. पण, प्रत्येक सामन्यात असे काही क्षण असतात जिथे तुम्ही संभाव्य सुधारणा करू शकतात.