चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स : आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 39 वा सामना चेपॉकमध्ये होणार आहे. आज IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. आजचा हा सामना चेपॉकमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील सामना सुरू होणार आहे. याआधी हे दोन्ही संघ लखनौच्या एकना स्टेडियमवर भिडले होते. यावेळी के एल राहुलच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सचा ८ विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, पण आज चेन्नईतील हवामानाचा पॅटर्न कसा असेल? ते जाणून घेऊयात.
कालचा पार पडलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल लढत पाहायला मिळाली. कालच्या हा सामन्यांमध्ये पावसाने जयपूरमध्ये दणका दिला. यामुळे बराच वेळ खेळ थांबवावा लागला. मात्र, या पावसानंतरही षटके कापली गेली नाहीत. मात्र, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा चेन्नईच्या हवामानावर खिळल्या आहेत.
चेन्नईमध्ये सुद्धा पावसाचं सावट?
आज चेन्नईत पाऊस पडेल का? चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात पाऊस खलनायक ठरणार? मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चेन्नईत आज पावसाची शक्यता नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये आज आर्द्रता 70 टक्क्यांच्या आसपास असेल. तर चेन्नईमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यान, ताशी 21 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.