टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ नेदरलँड संघासोबत क्रिकेटच्या मैदानावर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिडनी येथील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज दुपारी १२.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधी या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान सामन्यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यास सामन्याच्या ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात, तसंच अधिक पाऊस असल्यास सामना रद्दही केला जाऊ शकतो.
बुधवारी झालेल्या आयर्लंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार रिझल्ट काढला गेला. भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात पाऊस पडला तर या सामन्याचा निकाल देखील अशाच पद्धतीने काढला जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की, भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यापूर्वी पाऊस पडू शकतो. सध्या सिडनीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय वेळेनुसार सकाळी ७ : ३० च्या सुमारास सिडनी येथे पाऊस पडला. त्यामुळे नाणेफेकीपूर्वी किंवा नंतर पाऊस पडण्याची शक्यता नक्कीच आहे. ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
सामन्याच्या वेळी पाऊस पडल्यास सामना रद्द केला जाऊ शकतो. टी२० विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील.