
फोटो सौजन्य - The Switch | Kevin Pietersen युट्यूब
अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खान त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. तो आयपीएलमध्ये देखील गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याने आयपीएलमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी केली आहे. क्रिकेट खेळाडू आणि मोठे सेलिब्रिटी हे त्यांची लाईफ त्याच्या पद्धतीन जगतात. सेलिब्रिटी असण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सेलिब्रिटी बनल्याने ग्लॅमरस आयुष्य मिळते, पण त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वेळ घालवणेही कठीण होऊ शकते.
अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खानच्या बाबतीत असेच घडले आहे. आपल्या क्रिकेटमुळे जगभरात लोकप्रियता मिळवणाऱ्या रशीद खानला अफगाणिस्तानात फिरणे अत्यंत कठीण वाटते. या स्टार क्रिकेटपटूने सेलिब्रिटी असण्याचे तोटे सांगितले. इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांच्याशी झालेल्या संभाषणात, रशीद खानने अफगाणिस्तानात क्रिकेटपटू म्हणून त्याला येणाऱ्या अनेक तोट्यांबद्दल सांगितले.
संभाषणादरम्यान पीटरसनने विचारले, “तुम्ही काबूलच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरू शकता का?” रशीद खानने उत्तर दिले, “नाही.” तो म्हणाला, “मी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरू शकत नाही. माझ्याकडे बुलेटप्रूफ कार आहे.” हे ऐकून केविन पीटरसनला धक्का बसला. मग त्याने विचारले, “काबूलमध्ये तुमच्याकडे बुलेटप्रूफ कार का आहे?” रशीदने उत्तर दिले, “सुरक्षेसाठी. तुम्हाला चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहायचे नाही. अफगाणिस्तानात हे सामान्य आहे. प्रत्येकाकडे बुलेटप्रूफ कार असते.”
रशीद खानसाठी, कार ही स्टेटस सिम्बॉल किंवा लक्झरी नाही, तर ती वैयक्तिक सुरक्षेची गरज आहे. स्थिरतेचा अभाव असलेल्या देशात, सुरक्षेचे धोके असंख्य आहेत. रशीद खानने शांतपणे बुलेटप्रूफ कारचे महत्त्व स्पष्ट केले, ज्यामुळे केविन पीटरसन आश्चर्यचकित झाले.
रशीद खान जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतो आणि त्याचे चाहते खूप आहेत, ज्यामुळे तो अफगाणिस्तानातील सर्वात लोकप्रिय नागरिकांपैकी एक बनतो. राशिद खानने असेही म्हटले की, अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचा मला खूप अभिमान आहे. लेग-स्पिनरने सहा कसोटी, ११७ एकदिवसीय आणि १०८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ४५, २१० आणि १८२ विकेट्स घेतल्या.