Shahid Afridi: 'Pakistan cricket in 'ICU'...'; Shahid Afridi gave his own cricket board a home run..
Shahid Afridi : भारतीय संघाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयाने पाकिस्तानवर जणू शोककळा पसरली आहे. पाकिस्तानी माजी खेळाडू कधी भारतावर आगपाखड करतात तर कधी आपल्याच पाकिस्तान क्रिकेटवर टीका करताना दिसून येत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे. ज्याबद्दल आफ्रिदीने म्हटले आहे की, ‘येथे फक्त चेहरे बदलतात परिस्थिती नाही आणि त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये आहे.’ असे टो म्हणाला.
रविवारी 9 मार्च रोजी दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद दिले होते, पण त्याला साखळी फेरीही पार करता आली नव्हती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान प्रमुख मोहसीन नक्वी यांचे सर्व दावेही यातून उघड झाले आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून सांगत होते की त्यांनी संघ अधिक चांगला केला आहे. मात्र आफ्रिदीने आता त्यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा : Champions Trophy : ‘मला अपेक्षित ओळख मिळाली नाही…’ ; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘या’ स्टार भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत…
एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शाहिद आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानी बोर्डात फक्त चेहरे बदलतात. परिस्थिति नाही. प्रत्येक पीसीबी अध्यक्षांना वाटतं की ते गोष्टी दुरुस्त करू शकतात , पण चेहऱ्यांवरून व्यवस्था का बदलत नाही? असे दिसते की क्रिकेट अजूनही येथे आयसीयूमध्ये आहे आणि मोठ्या स्पर्धांपूर्वीच शस्त्रक्रियेबद्दल बोलले जाते, नंतर नाही.’
इतकेच नाही तर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या ताज्या निर्णयावर देखील आगपाखड केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी टी-20 संघाची घोषणा करण्यासोबतच निवड समितीने मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरून हटवले आहे. तसेच त्याच्या ऐवजी आगा सलमानकडे नेतृत्व देण्यात आले आहे. आफ्रिदी या निर्णयावर नाराज आहे. त्याचे म्हणणे आहे की, रिझवानवरच विश्वास दाखवायला हवा होता. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतरच रिझवानला पाकिस्तानी बोर्डाने कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, आता ५-६ महिन्यांतच त्याला दूर करण्यात आले आहे.
याशिवाय आफ्रिदीने पाकिस्तानी बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांचाही समाचार घेतला आहे. आफ्रिदी पुढे म्हणाला की, नक्वी यांना क्रिकेटचे ज्ञान नाही आणि ते स्वत: म्हणाले होते की, मला माहित नाही. परंतु, पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूने निश्चितपणे सांगितले की नक्वी एक सकारात्मक व्यक्ती आहेत. ज्यांना चांगले काम करायचे आहे. परंतु, त्यांनी केवळ एकाच भूमिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे.