
Shubman Gill nominated for ICC Player of the Month; Will have to deal with 'these' players..
शुभमन गिलने युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व करताना शानदार कामगिरी केली आहे. शुभमन गिल या युवा कसोटी कर्णधाराने ५ सामन्यांमध्ये ७५४ धावा फटकावल्या आहेत. ज्यात जुलै २०२५ मध्ये झालेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने ५६७ धावा केल्या होत्या. त्याने टीम इंडियासाठी प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देखील आपल्या नावे केला आहे.
युवा शुभमन गिलने चौथ्या क्रमांकावर भारतीय संघाला स्थिरता प्रदान केली आहे. जे काम विराट कोहली वर्षानुवर्षे करत आला होता, ती जबाबदारी गिलने चांगल्या प्रकारे निभावली. कर्णधारपद भूषवताना, त्याने त्याच्या पहिल्याच मालिकेत चमक दाखवली. दबावाखाली सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानंतर त्याने संघाचा आधारस्तंभ होऊन मोठं-मोठ्या खेळी खेळल्या.
भारताविरुद्धच्या या मालिकेत इंग्लडच्या बेन स्टोक्सने देखील चमकदार कामगिरी केली आहे. बेन स्टोक्स शेवटच्या कसोटीत मात्र दुखापतीमुळे खेळू शकला नाही. शेवटच्या कसोटीतून बाहेर पडण्यापूर्वी, त्याने 50.20 च्या सरासरीने 251 धावा केल्या आणि 26.33 च्या सरासरीने 12 बळी देखील टिपले. त्याने चेंडू आणि बॅटनेक चांगले योगदान दिले.
इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्सला सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. त्यानंतर, त्याला मँचेस्टरमध्ये सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्या कसोटीत, स्टोक्सने 5 विकेट्स घेऊन बॅटने 141 धावांची खेळी देखील खेळली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने २६५.५० च्या प्रभावी सरासरीने ५३१ धावा फटकावल्या. ज्यामध्ये पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १४७ धावांच्या संयमी खेळीचा समावेश आहे. बुलावायो येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे कसोटी सामन्यात प्रथमच नेतृत्व करणाऱ्या मुल्डरने नाबाद ३६७ धावांची ऐतिहसिक खेळी खेळली. ही साऊथ आफ्रिकेच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. तसेच मुल्डर गोलंदाजी करताना त्याने ७ बळी देखील टिपले.