लीग द हंड्रेडमधील चालू सामन्यात कोल्ह्या मैदानावर धावत सुटला(फोटो-@sykcricket)
द हंड्रेड क्रिकेट लीग आजपासून म्हणजेच ६ ऑगस्टपासून लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू झाली आहे. उद्घाटन सामना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स आणि लंडन स्पिरिट यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामनादरम्यान, एका कोल्ह्याने वेगाने मैदानात प्रवेश केला आणि तो मैदानात धावत सुटला. यावेळी मैदानावर चांगलाच गोंधळ उडाला. कोल्ह्याच्या प्रवेशाने खेळाडू, समालोचकांसह प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झालेले दिसून आले.
There’s a fox on the field! 🦊 pic.twitter.com/3FiM2W90yZ — Sky Sports Cricket (@SkyCricket) August 5, 2025
कोल्हा मैदानावर सगळीकडे धावत निघाला आणि मैदानाबाहेर गेला. स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करत असल्याचे दिसून आले. पण, मैदानावर उभ्या असलेल्या खेळाडूंचा मात्र चांगलाच थरकाप उडाला. हा सर्व प्रकार सामन्याच्या दुसऱ्या डावात घडुन आला. यजमान लंडन स्पिरिटने दिलेल्या ८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओव्हल इन्व्हिन्सिबल्स फलंदाजीला उतरला. लंडन स्पिरिटचा वेगवान गोलंदाज डॅनियल वॉरल गोलंदाजी करत असताना मध्ये अचानक कोल्हा दिसला.
हेही वाचा : IND vs ENG : DSP सिराजचे मायदेशात जंगी स्वागत! एचसीएचा खास बेत; व्हिडिओ पहा
सामन्याची स्थिती..
ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने लंडन स्पिरिटचे ८१ धावांचे माफक लक्ष्य केवळ ६९ चेंडूत पूर्ण केले आणि सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. रशीद खान आणि सॅम करन यांनी चेंडूने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. रशीदला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने ११ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शीदने सामन्यानंतर सांगितले की, “विजयाने सुरुवात केल्याने चांगले वाटले, मी गेल्या काही महिन्यांपासून गोलंदाजी केलेली नव्हती, परंतु गेल्या दहा वर्षांत मी जितके क्रिकेट खेळलो आहे त्याची मला मदत होते.”






