Durand Cup 2025 : ड्युरंड कपचा अंतिम सामना आज शनिवार रोजी कोलकाता येथे नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि डायमंड हार्बर एफसी या दोन संघात होणार आहे. ड्युरंड कपच्या १३४ व्या आवृत्तीमध्ये विजेत्या संघाला आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे. ज्यामुळे विजेत्या संघातील खेळाडू मालामाल होणार आहेत. विजेत्या संघाला १.२१ कोटी रुपये मिळणार आहे. जे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या १३७ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम असणार आहे.
ड्युरंड कप हा आशियातील सर्वात जुना आणि जगातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धांपैकी एक असून यावर्षी तो पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि स्पर्धात्मक खेळवला जाणार आहे. ड्युरंड कप आयोजन समितीने या वर्षी एकूण बक्षीस रक्कम २५०% ने वाढवून ३ कोटी रुपये इतकी वाढवली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम फक्त १.२ कोटी रुपये इतकी होती. स्पर्धेची लोकप्रियता, स्पर्धा आणि व्यावसायिक पातळीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जाता आहे.
या वर्षीचा अंतिम सामना हा शनिवारी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम), कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. जिथे गतविजेता नॉर्थईस्ट युनायटेड एफसी पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या डायमंड हार्बर एफसीशी दोन हात करणार आहे. डायमंड हार्बर एफसीने आपल्या पदार्पणाने सर्वांना प्रभावित करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता या संघाचे ध्येय जेतेपद जिंकून इतिहास रचण्याचे असणार आहे. ड्युरंड कप २३ जुलै रोजी सुरू झाला आहे. या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी ८ संघ बाद फेरीत पोहोचु शकले, आता या स्पर्धेचा अंतिम सामना २३ तारखेला खेळवला जाणार आहे.
हेही वाचा : Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे
‘जायंट किलर’ ठरलेला डायमंड हार्बर एफसी आपल्या पदार्पणाच्या हंगामातच ड्युरंड कपच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आता त्यांचेलक्ष्य पहिले विजेतपद जिंकण्याचे असणार आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या संघाला शनिवारी म्हणजे आज अंतिम फेरीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीसारख्या दिग्गज संघाला पराभूत करावे लागणार आहे. या वर्षीचा जेतेपदाचा सामना या अर्थाने देखील महत्त्वाचा आहे की दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी असणार आहे. जर नॉर्थईस्ट युनायटेड जिंकला तर ते त्यांचे सलग दुसरे ड्युरंड कप जेतेपद ठरेल कारण गेल्या ३४ वर्षांत कोणताही संघ असे करू शकलेला नाही. शेवटच्या वेळी ईस्ट बंगालने १९८९, १९९० आणि १९९१ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली होती.